Worli Heat And Run Accident News: वरळी येथे हिट अँड रन केसची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरुन पळ काढल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे. पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास वरळीतील एनी बेझंट मार्गावर अॅट्रीया मॉल जवळ ही घटना घडली आहे. मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्यासोबत ही घटना घडली आहे. (Worli Accident News)
वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाखवा हे कोळी दांपत्य सकाळी ससून डॉकला मच्छी आणण्यासाठी गेले होते. वरळी येथील हे दाम्पत्य मच्छी घेऊन परत येत असताना एका चार चकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. दुचाकीवर मच्छी मोठ्याप्रमाणात असल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दोघंही चार चाकी गाडीच्या बोनटवर पडले.
दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत गाडीच्या बोनेटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला स्वत:हून बाजूला होता आलं नाही.अशातच अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने गाडीचा वेग वाढवत पळवली. त्यात कोळी महिलेला त्याने फरफटत नेले. या अपघातात कार चालक पळून गेला असून कोळी महिलेला उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. या प्रकरणी वरळी पोलिस अधिक तपास करत आहे.
वरळीतील हिट अँड रन केसची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून कार चालकाचा कसून शोध घेण्यात येत होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर आणि पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी वरळी हिट अँड रन घटनास्थळाला भेट देऊन आढावा घेतला आहे. पोलिसांनी लगेचच तपासचक्र फिरवून अपघातातील बीएमडब्लू कार व कार चालकाला ताब्यात घेतलं आहे. वरळी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.