मुंबईत पाणी तुंबले : महापौर आणि आयुक्तांनी पाहा काय म्हटले, कोणाला धरले जबाबदार?

मुंबई जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल होत आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली.  

Updated: Jun 9, 2021, 02:17 PM IST
मुंबईत पाणी तुंबले : महापौर आणि आयुक्तांनी पाहा काय म्हटले, कोणाला धरले जबाबदार? title=
संग्रहित छाया

मुंबई : शहरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू होता. (Heavy rains in Mumbai) आता पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल होत आहे. (Heavy rains lash Mumbai as monsoon advances, waterlogging in several areas  ) मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली. यावर महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) आणि पालिका आयुक्त इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पाणी भरणार नाही असा दावा आम्ही कधीच केला नाही, असे महापौर म्हणाल्या. तर आयुक्तांनी पावसावरच खापर फोडले आहे. तर विरोधकांनी शिवसेनेलाच जबाबदार धरत टीका केली आहे.

'पाणी तुंबणार नाही, असा दावा कधीही केला नव्हता'

मुंबईत पाणी तुंबले : महापौर आणि आयुक्तांनी पाहा काय म्हटले, कोणाला धरले जबाबदार?

महापौर पेडणेकर म्हणाल्या, दहिसर मिलन सब वे, हिंदमाता कायम पाण्याखाली जाते, पण आता पाणी साचलेलं नाही. पाण्याचा निचरा झाला आहे. पाणी भरणार नाही असा दावा आम्ही कधीच केला नाही, चार तासात पाण्याचा निचरा होतो, हे स्पष्ट आहे. हाय टाईड वैगरे असेल तर पाण्याचा निचरा थोडा उशीरा होतो. इतर शहरांमध्ये पाणी तुंबलेले दिसते, असे त्यांनी सांगत विरोधकांवर निशाणा साधला.

राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा

195, 137 मिली, 85 मिली पाऊस आला तर पाणी साचवून समुद्रात सोडलं जाते. 2005 पासून उपाययोजना करत आल्याने आतापर्यंत करत आलो म्हणून आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. हिंदमाता प्रकल्पाला उशीर कारण कोरोनामुळे मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे विरोधकांना काय आरोप  करायचे ते करू देत, आमचं काम सगळ्या जगाने पाहिले आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांचा दावा खोडून काढला. 

मुंबई महापालिका आयुक्त चहल

मुंबईत 12 तासाचा 140 ते 160 मिली पाऊस झाला आहे. 24 तासात 500 मिली पाऊस झाला की अतिवृष्टी म्हणतात. पण एका तासातच 100 हुन अधिक पाऊस झाला आहे, असे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल म्हणाले. दहिसर सब वे, चुनभट्ट पाणी साचले. हिंदमातामध्ये यावेळी चार फूट उंचीचे रोड तयार केले, यामुळे प्रथमच हिंदमाताची वाहतूक थांबलेली नाही. 140 कोटींचा भूमिगत प्रकल्प सुरू आहे. तिथे पाणी साचू देणार नाही. दीड किमी प्रकल्प, 30 दिवस प्रकल्प पूर्ण व्हायला लागणार आहे. इथून पुढे कधीच पाणी साचणार नाही, असे पालिका आयुक्त यांनी दावा केला आहे.

 गांधी मार्केटला मोठी पाईपलाईन टाकत आहोत. 30 जूनपर्यंत हिंदमाता प्रकल्प जवळपास पूर्ण होईल. आता एक तासाच्या आत एवढा पाऊस पडला की 30 मिली पेक्षा अधिक पाऊस एका तासात पडला की पाणी साचायला लागते, यामुळे ड्रेनेजमधून पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागणारच ना. 140 कोटींचा मोठा प्रकल्प आहे, ऑक्टोबरमध्ये प्रकल्प सुरू केला. जानेवारीमध्ये ऑर्डर दिली. प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे, असे ते म्हणाले. रेल्वे बरोबर समन्वयाबाबत काही बोलायचं नाही, पालिकेने रेल्वे भागातही नालेसफाई केलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नालेसफाईवर भाजपने टीका केली आहे. भाजपचे गटनेत प्रभाकर शिंदे यांनी सत्ताधारी शिवसेनेला जबाबदार धरले आहे. आपण गटनेता बैठकीत नालेसफाई तात्काळ व्हावी, अशी मागणी होती. कालच्या बैठकीत महापौरांनी अधिकाऱ्यांचं कौतुक केलं होते, पण पहिल्याच पावसात मुंबईत पाणी साचलेलं  पाहायला मिळाले आहे, असे ते म्हणाले.

रेल्वे आणि वाहतुकीवर परिणाम

मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल झाले होते. संततधार पावसाचा रेल्वे आणि वाहतुकीवर परिणाम झाला झाला. एकीकडे रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे ठाणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वाशी ते अंधेरी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सायन स्थानकावर प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी साचले आहे. कुर्ला स्थानकातही पाणी साचले आहे. मात्र, ठाणे रेल्वे स्थानकावर पाणी साचलेलं नाही. परंतु ठाण्यापासून सीएसएमटीपर्यंत रेल्वे सेवा ठप्प असल्याने ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.