मुंबई: मी डॉक्टरांचा कोणताही अपमान केलेला नाही. शाब्दिक कोटी आणि अपमान यांच्यातला फरक आपल्याला कळायला हवा, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंपाऊडरला डॉक्टरपेक्षा जास्त ज्ञान असते, अशा आशयाचे विधान केले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर डॉक्टरांच्या काही संघटना आक्रमक झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, डॉक्टरांवर संकट आली आहेत तेव्हा व्यक्तीश: मी मदतीला गेलोय. एका विशिष्ट राजकीय विचाराची लोक मोहिम चालवत असतील तर योग्य नाही. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून कोटी झालीय. डॉक्टरांचा बहुमान आहे की, कंपाऊंडरला त्यांनी इतकं निष्णात केले आहे. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून काही डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
याप्रकरणात मी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही माझ्या विधानाचा अर्थच समजवून घेत नाही. बोलण्याच्या ओघात डॉक्टरांविषयी शाब्दिक कोटी झाली. यामुळे कोणाचा गैरसमज झाला असेल तर दूर करावा, मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, असेही राऊत यांनी म्हटले.
तसेच मी जागतिक आरोग्य संघटनेबाबत WHO केल्या वक्तव्याचा आपल्याकडे निषेध होण्याचे कारण नाही. जागतिक पातळीवरील अनेक नेत्यांनी WHO ला फटकारले आहे. सध्या WHO ही राजकीय संघटना झालीय, एका देशाची बटीक झालीय. WHO कोरोना प्रसारास कारणीभूत असल्याचा आरोप अनेक देशांनी केल्याचे राऊत यांनी सांगितले.