जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तिकिट मिळाल्यानंतर आपण एबी फॉर्मसह अर्ज भरणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपात अखंड 42 वर्ष काढली. एकनाथ खडसे यांचं नाव पहिल्या यादीत येणं अपेक्षित होतं. पण ते आलं नाही. कदाचित एवढ्या घाईगडबडीत राहिलं असावं.
मात्र दुसरीकडे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या एकाच तिकिटासाठी दोन जणांमध्ये संघर्ष सुरू आहे, म्हणून ते राहिलं असंही म्हणण्याचं कारण नाही. पण दुसऱ्या यादीत खडसेंना तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे, असं देखील म्हणता येईल.
पण एकवेळेस असा विचार करा, एकनाथ खडसे यांना भाजपने तिकिट दिलं नाही तर काय होईल?. एकनाथ खडसे यांची नाराजी आणि त्यानंतरची आतापर्यंतची त्यांची भाषणं आणि वक्तव्यांचा विचार केला. तर तिकिट मिळालं नाही, म्हणून एकनाथ खडसे काही भाजप सोडणाऱ्यातले नाहीत.
एकनाथ खडसे छुपं राजकारण करतील असंही नाही, पण ते या दु:खात आणखी स्पष्ट बोलतील. अनेक वेळा त्यांनी पक्ष किंवा इतर व्यक्तिंविषयी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. अनेक कार्यक्रमात आपल्या मनातील दु:ख त्यांनी कधी शब्दांनी तर कधी चित्रपटातील गाण्यांनी, तर कधी शेरो शायरीने व्यक्त केलं आहे.
मी पक्षात एवढी वर्ष काढली आहेत, आणि मी काही पक्ष विरोधात नाही, तर जे काही माझ्या कार्य़काळात झालं आहे, ते स्पष्टपणे मी बोलतोय, असाच उद्देश खडसेंचा यामागे उद्देश दिसून येतोय.
एकनाथ खडसे वरील प्रमाणे दुसऱ्या पक्षात जाण्याचाही विचार करणार नाहीत. गाण्यांची आवड असणारे खडसे, 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गयाँ', असंच आतल्या आत म्हणत आपल्या दु:खाला कवटाळत बसतील. एकनाथ खडसेच काय, या जागेवर कुणीही असलं, तरी त्या व्यक्तीची तिच अवस्था होईल.
पण एकनाथ खडसे यांना तिकिट दिलं नाही, तर त्याचे 'साईड इफेक्ट' पक्षात फार जास्त दिसतील. हे साईड इफेक्ट लगेच दिसणार नाहीत. पण जळगाव जिल्ह्यात ते सर्वात आधी दिसतील. यानंतर इतरत्र कमी प्रमाणात का असेना, याचा परिणाम होईल.
कारण एकनाथ खडसे यांच्यासोबत असं होऊ शकतं, तर आमचं काय? असा सवाल मनातल्या मनात आणि चर्चा करताना, सर्वसामान्य कार्यकर्ता नक्कीच करणार आहे. कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांच्या आत्मविश्वासाला यामुळे नक्कीच ठेच लागेल.
एकनाथ खडसें यांचं नाव उमेदवारीच्या पहिल्या यादीत आलं नाही, तरी देखील लोकांकडून बोलताना सहानुभूती दिसून येत आहे. जर त्यांना तिकिट मिळालं नाही, तर सहानुभूती निर्माण होईल हे स्पष्टच आहे.
प्रश्न हा फक्त एकनाथ खडसे यांचा नाही. प्रश्न हा संपूर्ण कार्यकर्त्यांचा आणि वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आणि जनतेचाही आहे. कारण सर्वत्र काँग्रेसची लाट असतानाही, जळगाव जिल्ह्यात अनेकवेळा असं झालं की, जनतेने भाजपाला कौल दिला आहे.
एकनाथ खडसे यांच्यासमोर पक्षात अनेक दिग्गज नेते होवून गेले, अनेकांनी खासदारकी, तर काहींनी आमदारकी साकारली. जळगाव जिल्हा हा भाजपाकडून सर्वात जास्त वेळेस कौल देत आला आहे.
पण सतत भाजपाच्या बाजून कौल देणाऱ्या जिल्ह्यासाठी खडसेंना डावलणे हा मोठ्य़ा चर्चेचा विषय ठरेल, आणि तो जनतेने आणि त्यापेक्षाही कार्यकर्त्यांनी जास्त मनाला लावून घेणे, हे पक्षासाठी निश्चितच योग्य ठरणार नाही. तर खडसेंच्या स्वभावात यानंतर जो अधिक स्पष्टवक्तेपणा येईल, त्याचा सामना पक्षातील काही मंडळींना नक्कीच करावा लागेल.