मुंबई : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या महामारीने आतापर्यंत जगातील लाखो नागरिकांचा बळी घेतला आहे. आजच्या सद्य स्थितीत अत्यावश्यक सेवेततील कर्मचारी या संकटावर मात करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. डॉक्टर, नर्स, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाप्रती आपले कर्तव्य बजावत आहे.
अशाच एका कोरोना वीरासोबत झी २४ तासच्या इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. कोरोना वीर डॉ. बंडोपंत देशमुख यांनी झी २४ ताससोबत बोलताना अनेक गोष्टींचा खुलासा केला. सध्या ते ठाण्याच्या सीव्हील रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत.
सध्या संपूर्ण जगात असं बोललं जात आहे की आता आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकायला हवं तर दुसरीकडे हे कोरोनावीर अशा आणीबाणीच्या परिस्थितीत कोरोनासह वावरत आहेत. त्यामुळे कोरोनावीरांसाठी नगरिकांनी काही दिवस सरकारकडून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील डॉ. बंडोपंत देशमुख यांनी केले.
दरम्यान, मुंबईत आज कोरोनाचे १४१३ रुग्ण वाढले असून आज एकाच दिवसात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४० हजार ८७७ वर पोहोचली आहे. देशात मुंबई कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनली आहे.