Kalyan Loksabha : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यानंतर कल्याणची जागा मिळवण्यासाठी सोबत असलेल्या पाच जणांचा बळी द्यावे लागले अशी टीका मुख्यमंत्र्यांना लक्ष करत आदित्य ठाकरे यांनी केली होती. यावर आता ज्याची जी कुवत आहे त्याप्रमाणे वक्तव्य केली पाहिजेत, आपल्या कुवतीपेक्षा जास्त झेपत नसतील ती वक्तव्य करू नका असा पलटवार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केलाय. कल्याण पूर्व मध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्याला श्रीकांत शिंदे उपस्थित होते त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघातील बुथवर तिन्ही पक्षांचे 70 ते 80 हजार कार्यकर्ते काम करणार असल्याची माहितीही श्रीकांत शिंदे यांनी दिला.
डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून पदाधिकारी मेळावा रविवारी संपन्न झाला. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना भाजपा पदाधिकारी देखील उपस्थित होते. या मेळाव्याला खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
याबाबत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागलेत. कल्याण लोकसभेत शिवसेना भाजप आणि आरपीआय अशी युती होती. आता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी झाल्याने राष्ट्रवादीची ताकद देखील आम्हाला मिळाली. तिघांच्या ताकदीमुळे मताधिक्याच्या नवीन रेकॉर्ड कल्याण लोकसभा मतदारसंघात होणार आहे. बुथ रचनेवर प्रत्येक पक्षाने चांगल्या प्रकारे काम केलं तर 70 ते80 हजार कार्यकर्ते तिन्ही पक्ष मिळून मिळतील आणि त्या माध्यमातून प्रत्येक बूथपर्यंत प्रत्येक वोटर पर्यत त्या ठिकाणी पोहोचता येईल असे म्हटलं आहे.
दुसरीकडे आदित्य ठाकरेंच्या आरोपांनाही श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "ज्याची जी कुवत आहे त्याप्रमाणे त्याने ती वक्तव्ये केली पाहिजेत. आपल्या कुवतीपेक्षा जास्त वक्तव्ये झेपत नसतील तर करु नका," असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.