मुंबई : 'येत्या १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी राज्य सरकार पुरस्कृत अघोषित लोडशेडिंग केलं जाणार आहे. त्यामुळं आपल्याकडचे जनरेटर्स, इनव्हर्टर्स आणि मेणबत्त्या तयार ठेवाव्यात,' असे आवाहन मनसैनिकांना करण्यात आले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन करण्यात आलेली ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामूळे फेसबूकवर सध्या या पोस्टचीच चर्चा आहे.
राज ठाकरे स्टाईल मधली ही उपरोधिक पोस्ट एव्हाना प्रत्येक मनसे कार्यकर्त्यापर्यंत पोहोचली असेल. १८ नोव्हेंबरला ठाण्यात राज ठाकरेंची सभा होणार आहे. यावेळी अघोषित लोडशेडिंग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सभेला येणाऱ्या प्रत्येकाने जनरेटर्स, इनव्हर्टर्स आणि मेणबत्त्या सोबत ठेवाव्यात असे सांगण्यात येत आहे.
'जनहितार्थ महत्त्वाची माहिती' या मथळ्याखाली ही पोस्ट पाहायला मिळेल. शनिवारी संध्याकाळी काही तासांकरता आणीबाणीचा प्रयोग होऊ शकतो, असा आरोप या पोस्टच्या माध्यमातून मनसेने केला आहे.
राज ठाकरे यांचे भाषण नंतरही यू-ट्यूब, व्हॉट्सअॅप व फेसबुकवरही पाहता येईल. अडाणी सरकारला याची कल्पना नसली तरी आपण सूज्ञ आहात,' असा चिमटाही शेवटी मनसेन या पोस्टमधून काढण्यात आला आहे. या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
दुपारी अडीचच्या दरम्यान ही पोस्ट टाकल्यानंतर अवघ्या दोन तासात दिड हजारहून अधिक जणांनी शेअर केली आहे.