मुंबई : कोरोना coronavirus काळात सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत मध्यमवर्गीय नागरिकांसाठी शासनाकडून काही नियमांमध्ये शिथिलता आणावी अशी सातत्यानं मागणी करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षापुढं आता कोळी महिलांनी मदतीसाठी धाव घेतली आहे.
'मनसे'च्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबतची माहिती देण्यात आली. ज्यामध्ये मुंबईचे मूळ रहिवासी अशी ओळख असणाया कोळी समाजातील या महिलांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी जात परप्रांतीयांविरोधाती भूमिका मांडली.
मुंबईतील डोंगरी येथे असणाऱ्या मासळी बाजाराबाहेर परप्रांतीय मासे विक्रेत्यांची वाढती संख्या पाहता हाच मुद्दा त्यांनी राज ठाकरे यांच्यापुढे उचलून धरला. या वेळी खुद्द राज ठाकरे यांनीही या महिलांची भेट घेत त्यांचे प्रश्न ऐकून घेतल्याचं पाहायला मिळालं. परप्रांतीय मासेविक्रेत्यांमुळं आपल्या व्यवसायावर गदा येत असल्याचं म्हणत या बेकायदेशीर मासे विक्रेत्यांना हटवा अशीच मागणी या महिलांनी केली.
व्यवसायाची मंदावलेली गती आणि या कोळी समाजातील महिलांचे प्रश्न ऐकून परिस्थितीवर तोडगा काढत प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन राज ठाकरे यांनी दिली. मनसेकडूनच याबाबची माहितीही पुरवण्यात आली. तेव्हा आता यावर राज ठाकरे नेमके तोडगा काय काढतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मुंबईत डोंगरी मासळी बाजाराबाहेर परप्रांतीय मासेविक्रेत्यांचं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण. त्यांच्या मुजोरीमुळे कोळी बांधवांचा व्यवसाय मंदावला.
'राजसाहेब, त्या बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा' अशी मागणी करत कोळी भगिनी कृष्णकुंजवर. राजसाहेबांनी प्रश्न मार्गी लावण्याबद्दल केलं आश्वस्त. pic.twitter.com/wURbzeNEzx
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 5, 2020
दरम्यान, कोरोना काळात व्यवसायात आलेला उतार पाहता पुन्हा एकदा नवी सुरुवात करण्यासाठीच्या काही मागण्यांसह आणि मार्गदर्शनासाठी म्हणून रिक्षा चालक, मुंबईचे डबेवाले, जीम ट्रेनर, सलून व्यावसायिक आणि आता कोळी महिला अशा अनेक घटकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदत मागितली आहे. मुख्य म्हणजे बहुविध परिंनी त्यांना आश्वासनांसोबतच ही मदतही मिळाली आहे. त्यामुळं सध्या ही 'मनसे' मदतही चर्चेचा विषय ठरत आहे.