महाराष्ट्र बंदने प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व सक्षम, भाजपसह आठवलेंना मात्र चिंता

महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व दलित समाजात अधिक सक्षम आणि प्रस्थापित झाल्याचं चित्र आहे.  

Updated: Jan 4, 2018, 10:48 PM IST
महाराष्ट्र बंदने प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व सक्षम, भाजपसह आठवलेंना मात्र चिंता title=

दीपक भातुसे / मुंबई : कोरेगाव भीमामधील घटनेच्या निषेधार्थ काल पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व दलित समाजात अधिक सक्षम आणि प्रस्थापित झाल्याचं चित्र आहे. या घटनेमुळे भाजपाबरोबर असलेल्या रामदास आठवले यांची मात्र चिंता वाढणार आहे.

दलित समाजात नव्याने प्रस्थापित

महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर तो यशस्वी करणं हे बंदची हाक देणाऱ्या संघटनेचं अस्तित्व पणाला लावणारं आणि त्या संघटनेची ताकद दाखवणारं असतं. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर हा बंद यशस्वी होईल का अशी चर्चा होती. मात्र प्रकाश आंबेडकरांच्या बंदच्या हाकेला प्रतिसाद देत राज्यभर दलित समाज रस्त्यावर उतरला आणि त्यांनी हा बंद यशस्वी करून दाखवला. यामुळे एकीकडे प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व दलित समाजात नव्याने प्रस्थापित झाल्याची चर्चा आहे.

कोरेगाव-भीमा पडसाद : रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपाइंची बैठक

दलित समाजाचा राग सरकारविरोधात 

तर दुसरीकडे या बंद आणि आंदोलनामुळे भाजपाबरोबर असलेल्या रामदास आठवले आणि भाजपाच्याही चिंतेत भर टाकली आहे. प्रामुख्याने बंदच्या आंदोलनात दलित समाजाचा राग हा सरकारविरोधात होता. या आंदोलनात प्रामुख्याने सरकार आणि भाजपाविरोधात राग निघत होता. त्याचा फटका रामदास आठवलेंना बसण्याची चिन्हं आहेत. असं असतानाही सरकारमध्ये असलेल्या रामदास आठवले यांनी संसदेत याप्रकरणी भाजपाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

भाजपचे हिंदूत्व दलितांना मान्य नाही!

एकीकडे भाजप आणि त्यांचे हिंदूत्व दलितांना मान्य नाही, तर दुसरीकडे रामदास आठवले भाजपाची बाजू सावरून घेत असल्याने सहाजिकच दलित समाजाचा राग त्यांच्यावरही निघताना दिसत आहे. दलित समाजात प्रामुख्याने रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर हे दोन मोठे गट कार्यरत आहेत. आतापर्यंत रामदास आठवले गटाचे दलित समाजात वर्चस्व होते. मात्र भीमा-कोरेगाव घटनेनंतर आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ही स्थिती बदलताना दिसते आहे. 

दलित समाज आंदोलनाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली

दलित समाज एकगठ्ठा आंबेडकरांच्या मागे

रामदास आठवलेंनी भीमा कोरेगाव घटनेमध्ये ठोस भूमिका न घेतल्याने नाराज असलेला दलित समाज एकगठ्ठा प्रकाश आंबेडकरांच्या मागे गेला तर त्याचा फटका भाजपालाही बसण्याची चिन्हं आहेत. राज्यात अनुसुचित जातींसाठी विधानसभेचे २९ मतदारसंघ राखीव असून या व्यतिरिक्त अनेक मतदारसंघात दलित मतांचा प्रभाव आहे. त्यामुळे त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसेल अशी भीती आता भाजपाला वाटू लागली आहे.