मुंबई: राज्य सरकारने निर्बंध शिथिल करुनही आज सकाळी मुंबईतील मद्याची दुकाने सुरु न झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे तळीरामांमध्ये मद्याची दुकाने सुरु होणार किंवा नाही, याबाबत संभ्रम होता. मात्र, आता लवकरच हा गोंधळ दूर होणार आहे. थोड्याचवेळात शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी मुंबईतील मद्याची दुकाने सुरु करण्याचे आदेश जारी करणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिली. त्यामुळे दुपारनंतर किंवा उद्यापासून मुंबईतील दुकाने सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दारूच्या दुकानांबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
तत्पूर्वी राज्य सरकारने रेड झोनमध्येही मद्याची दुकाने सुरु करण्याचे आदेश दिल्यामुळे आज सकाळपासून अनेक मद्यप्रेमी वाईन शॉपबाहेर रांगा लावून उभे होते. राज्यात अन्य ठिकाणीही असेच चित्र होते. मात्र, प्रशासनाकडून आदेश न आल्यामुळे बहुतांश वाईन शॉपच्या मालकांकडून दुकाने बंदच ठेवण्यात आली होती. त्यामुळे मद्यप्रेमींना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले होते.
बऱ्याच ठिकाणी वाईन शॉपबाहेर मद्यप्रेमींची गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे काही ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीमार करून या तळीरामांना पिटाळावे लागले. मात्र, आता मद्याची दुकाने नियमितपणे सुरु राहिल्यास आगामी दिवसांत ही गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य सरकारने मद्याची दुकाने सुरु ठेवण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. दुकानदारांना या अटींचे पालन करणे बंधनकारक आहे.
काय असतील मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसाठीच्या अटी?
*दुकानावर येणार्या नोकराची आणि ग्राहकांचीही थर्मल स्कॅनिंग करावी लागणार.
*ज्यांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं आहेत अशा ग्राहक, नोकरांना दुकानात प्रवेश देऊ नये.
*दुकान आणि त्या सभोवतालच्या परिसराचं दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करावं.
*ग्राहकांसाठी हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावं.
*सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेतच दुकान उघडे ठेवता येणार.
*शहरी भागात कंन्टेमेंट झोन वगळून इतर भागातील एकल दुकानं सुरू राहतील.