नरेंद्र पाटील यांच्याबाबत असं बोलले उदयनराजे

सातारा लोकसभा मतदारसंघात प्रचार तापत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी त्यात आणखीनच तेल घातलं आहे.

Updated: Apr 7, 2019, 10:40 PM IST
नरेंद्र पाटील यांच्याबाबत असं बोलले उदयनराजे title=

प्रसाद काथे, कार्यकारी संपादक, झी २४ तास, मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघात प्रचार तापत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी त्यात आणखीनच तेल घातलं आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी, शिवसेनेचे उमेदवार आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची 'यात्रेकरू' अशी संभावना केली. राजे झी २४ तासच्या 'मुक्तचर्चा' या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

मुक्तचर्चा या विशेष कार्यक्रमाचं संचालन कार्यकारी संपादक प्रसाद काथे यांनी केलं, तर वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनीही यात सहभाग नोंदवला. त्या प्रश्नांच्या सरबत्तीला यशस्वी तोंड दिलं.

खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत असलेले अनेकजण आतून नरेंद्र पाटील यांना मदत करत आहेत का ? या प्रश्नाला त्यांनी नाही असं स्पष्ट उत्तर दिलं. आपल्या उत्तरात उदयनराजे यांनी नरेंद्र पाटील यांच्यावरही टीका केली. त्यांना यात्रेकरू ठरवत, पाटील सातारा जिल्ह्यात रस्ता शोधायला जीपीएस वापरतात असा दावा केला. इतकंच नव्हे तर, जीपीएस नेटवर्क नसेल तिथं पाटील रस्ता चुकतात आणि त्यांना वाट दाखवायला आपण माणसं पाठवतो, असा दावाही उदयनराजे यांनी केलाय.

मुक्तचर्चा कार्यक्रमातील मुलाखतीत उदयनराजे यांनी मतदारसंघात आपल्या कामाचा पाढाच वाचून दाखवला आणि प्रतिस्पर्ध्याकडे काय आहे सांगायला असा सवालही केला. तसंच, घराण्याच्या जोरावर मतांचा जोगवा मागत नसल्याचं मतही नोंदवायला उदयनराजे विसरले नाहीत.