मुंबई : राज्यात आघाडीत घडलंय बिघडलंय असं म्हणायची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची बोलणी स्पष्ट होईल असं बोललं जात होतं. पण निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर लगेचच दोन दिवसांत आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नगरच्या जागेचा तिढा न सुटल्याने सुजय यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. तिकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जागांचा तिढा सोडवण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अखेरची मुदत दिली आहे. त्यामुळे राजु शेट्टी काय करणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. नागपुरात गडकरींविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या नाना पटोले यांच्या स्वप्नांना सुरुंग लागला. टोले यांना नागपुरातून उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधींना ई-मेल करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानं सर्वाधिक कोंडी राधाकृष्ण विखे पाटलांची झाली आहे. मात्र तरीही विरोधी पक्षनेतेपद सोडणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मुलाचा भाजप पक्षप्रवेश रोखू शकले नाहीत. राधाकृष्ण विखे पाटलांनी गेली पाच वर्षं विरोधी पक्षनेतेपद भूषवलं असलं तरी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना कधीच लक्ष्य केलं नाही. त्यामुळे त्यांचं साटंलोटं असल्याची चर्चा अनेकदा झाली. त्यात विखे पाटील घराण्याचा इतिहास पाहता बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शिवसेनेत जाऊन एकेकाळी मंत्रिपदं भूषवली आहेत. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटील काय करणार, याची उत्सुकता आहे.