Loksabha Nivdnuk Nikal 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला जोरदार धक्का बसलाय. तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जोरदार मुसंडी घेतलीय. आतापर्यंतच्या निकालानुसार महाविकास आघाडी 29 जागांवर तर महायुतीला (Mahayuti) 18 जागा मिळाल्यात. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. काँग्रेसला राज्यात 13 त्यापाठोपाठ भाजपला 10 तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 9 जागा मिळाल्या आहेत. शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी 7 जागा मिळाल्यात आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एकच जागा मिळालीय. यावर यावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट
पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केलं. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसर्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो !
इंडि आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.
उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मा. मोदीजींना साथ दिली आहे.
संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू. महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत, मी त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो.
देशातही काँग्रेसची जोरदार मुसंडी
देशभरातही इंडिया आघाडीनं जोरदार मुसंडी मारलीय. भाजपप्रणित सत्ताधारी एनडीएला मोठा धक्का बसलाय. सत्ताधारी एनडीएला 300 च्या आत रोखण्यात इंडिया आघाडीला यश मिळालंय. सर्वात महत्वाची बाब म्हणजे तब्बल 10 वर्षानंतर भाजपला स्वबळावर सत्ता मिळणार नाही, असंच सध्याचं चित्र आहे. सत्ताधारी एनडीएला 292 च्या आसपास जागा मिळतील, असं दिसतंय. याउलट इंडिया आघाडीनं तब्बल 234 जागांवर मजल मारलीय.