Samadhan Sarvankar Post: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची वेळ जसजशी जवळ येतेय, तसे राजकीय नाट्याला नवं वळण येत चाललंय. सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी अर्जावरुन नाराजी नाट्य पाहायला मिळतंय. या सर्वात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवरणकर सध्या चर्चेत आहेत. माहिम मतदार संघातून त्यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. एबी फॉर्मदेखील दिला. पण त्याच मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी श्रीकात शिंदे यांच्यासाठी सभा घेतली होती. नरेंद्र मोदींना पाठींबा जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर आता सदा सरवणकर यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणण्यात येतोय. या सर्वात कालपासून सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्या सोशल मीडियातील स्टेटस पाहून चर्चांना उधाण आलंय.
सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर हे माजी नगरसेवक आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी वडिलांवर दबाव वाढल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. यानंतर आपण उमेदवारी अर्ज भरायला जातोय, असे स्टेटस ठेवत समाधान सरवणकर यांनी उमेदवारांमध्ये विश्वास जागता ठेवलाय. दरम्यान सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी पुन्हा एकदा स्टेटस ठेवून खळबळ उडवून दिली आहे.
अखंड जग हे महाराष्ट्राला लढवय्या म्हणुन ओळखत आणि जो लढतो तो खरा लढवय्या. नावाची कीर्ती ही कामाने होते, असे समाधान सरवणकर आपल्या पोस्टमध्ये म्हणतात. छत्रपती हे लढले. जिंकले. अनेक संकटाला सामोरे गेले, तेव्हा ते अधिपती झाल्याचे उदाहरण त्यांनी दिले. जर मनगटात बळ असेल तर घाबरायचं कशाला? समोर कोणी लढू नये ही अपेक्षा चुकीची आहे. जनतेला हे कधीही आवडणार नाही, असे समाधान आपल्या पोस्टमध्ये म्हणतात.
त्यामुळेच आज सरवणकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी आपल्या व्हॉट्सअपवर एक स्टेटस ठेवलं आहे. त्या स्टेटसनुसार सरवणकर हे अर्ज भरण्यावर ठाम असून तो केवळ आजच्याऐवजी उद्या म्हणजेच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल करणार आहेत. "आमदार सदा सरवणकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता सर्वांनी शाखा क्रमांक 194, सामना प्रेस प्रभादेवी इथे उपस्थित रहावे," असं समाधान यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर म्हटलं आहे. मागील अनेक दशकांपासून माहिममधून आमदार असलेल्या सदा सरवणकर यांनी महायुतीमधील घटक पक्षांचा आणि खुद्द मुख्यमंत्र्यांचा विरोध डावलून खरोखरच अर्ज भरला तर मुख्यमंत्री शिंदेंबरोबरच ते राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंसाठी अडचणीचं ठरु शकतं.