Srinivas Vanga on Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आगामी विधानसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करताना आपल्यासह बंडात सामील झालेल्या आमदारांना उमेदवारी देण्याचं मोठं आव्हान होतं. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासह गुवाहाटीला येत बंडात सहभागी झालेल्या 39 आमदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण पालघरचे श्रीनिवास वनगा यांना मात्र नशिबाने साथ दिलेली नाही. श्रीनिवास वनगा बंडात सहभागी होऊनही उमेदवारी न मिळालेले एकमेव उमेदवार ठरले आहेत.
ज्या श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचं कारण दाखवून एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्याच आमदाराला वगळल्याने श्रीनिवास वनगा हे मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. त्यांनी कालपासून अन्न पाणी सोडून दिलं आहेत. इतकंच नाही तर ते मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचले असून आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली असून उद्धव साहेब आमच्यासाठी देव होते परंतु एकनाथ शिंदे यांनी आमचा घात केला असं त्यांच्या कुटुंबियांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे. जर श्रीनिवास वनगा यांचं काही बरं वाईट झालं तर आम्ही कुणाला जबाबदार धरायचं असा सवाल त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
"तू मतदारसंघातून निवडून येत नाही. तुझा रिपोर्ट चांगला नाही हे सांगून मला त्यावेळीही डावललं होतं. मला थांब सांगितल्याने मी प्रामाणिकपणे थांबलो होतो. आज मला चांगली संधी आली होती. मी चांगलं काम केलं होतं. कशासाठी मला डावललं? आमच्या प्रामाणिकपणाचं हे फळ आम्हाला मिळालं," असा संताप श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केला.
"कालपासून ते जेवतच नाहीत. काही बोलतही नाहीत. वेड्यासारखे वागत असून आत्महत्या करणार असल्याचं बोलत आहे. माझं आयुष्य संपून गेलं आहे म्हणतात. उद्धव ठाकरे देवमाणूस होते असं म्हणतात. मी एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवला ही माझी चूक झाली. त्यांनी मला शब्द दिला होता. 39 आमदारांचं पुनर्वसन केलं, माझ्या पतीचं काय तुकलं. दोन तीन दिवसांपासून जेवतच नाही.मी आणि आई समजावून ऐकतच नाही. आधी म्हणाले येथून देणार नंतर म्हणाले डहाणूतून देणार. पण कुठेच नाव आलं नाही," असं गाऱ्हाणं श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमना वनगा यांनी सांगितलं.
पालघरमध्ये श्रीनिवास वनगा यांनाच तिकीट मिळेल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र पालघरमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. कारण एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमध्ये असलेल्या श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट झाला. त्यांच्या जागी राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली.
राजेंद्र गावित यांनी आतापर्यंत काँग्रेस, भाजपा, शिवसेना, शिंदे-गट, पुन्हा भाजप असं चार वेळा पक्षांतर केलं होते. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रांजेंद्र गावित यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी घेत पाचव्यांदा पक्षांतर केलं. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी राजेंद्र गाविर यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे आता राजेंद्र गावित यांचा सामना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार जयेंद्र दुबळा यांच्याशी होणार आहे.