धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याचा पहिलाच दणका, मंत्रिमंडळ बैठकीत घेतला मोठा निर्णय

आरोपीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होईल, अशी तरतूद कायद्यात करणार, याच अधिवेशनात कायदा लागू करणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. खातेवाटप झाल्यानतंर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाट्याला कृषीमंत्री पद आलं आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 17, 2023, 11:43 PM IST
धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याचा पहिलाच दणका, मंत्रिमंडळ बैठकीत घेतला मोठा निर्णय title=

Maharashtra Assembly Monsoon Session 2023 : राज्यात बोगस बियाणे (Bogus Seeds), खते (Fertilizers), कीटकनाशके (Pesticides) यांची विक्री करणाऱ्या काहीजणांवर अलीकडे कारवाई झाली आहे, मात्र बोगस बियाणे, औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला असून, चालू पावसाळी अधिवेशनातच बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Assembly Session) पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली.

ज्याप्रमाणे बीटी-कापूस बियाण्यांच्या बाबतीत बोगस बियाणे वितरित करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो, त्याच धर्तीवर तोच कायदा अन्य बियाण्यांच्या, खतांच्या व कीटकनाशकांच्या बाबतीतही लागू करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी एक विशेष समितीही स्थापन करण्यात आली असल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.

दरम्यान असा कायदा अस्तित्वात आणण्यासाठीचे प्रारूप तयार करण्याचे काम सुरू असून, समितीचा निर्णय होताच, चालू पावसाळी अधिवेशनातच हा कायदा लागू करण्यात येईल, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितलं. 

विरोधकांची सरकावर टीका
शेतक-यांबाबत सरकार गंभीर नाही असा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. शेतकरी प्रश्नावर तातडीने चर्चा करावी असा स्थगन प्रस्ताव काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी मांडला, मात्र सरकारने या प्रश्नावर बोलू दिलं नाही असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसंच ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभूंनी केलाय. 

अधिवेशनाची वादळी सुरुवात
पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत फूट पाडत अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाल्यावर हे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सरकारला कायदा सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून घेरण्याचा निर्धार विरोधकांनी केला आहे. अजित पवारांनीच सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद सध्या रिक्त आहे. या पदाचा तिढा कायम आहे. सध्या विरोधकांमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक 44 आमदार आहेत. मात्र काँग्रेसने अजूनही या पदावर दावा सांगितलेला नाही. कागदावर राष्ट्रवादीचंच संख्याबळ अधिक असल्याचं प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.