स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : भाजप (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या विरोधात बलात्कार आणि धमकी देण्याचा आरोप करणाऱ्या महिलेने आपली तक्रार मागे घेतली असल्याची माहिती समोर आला आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) येथील ऐरोली विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार यांच्याविरोधात सहा महिन्यांपूर्वी दीपा चौहान या महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बेलापूर पोलीस ठाण्यात धमकी दिल्या प्रकरणी तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता तक्रारदार महिलेने तिची तक्रारच मागे घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने भाजप आमदार मंत्रा म्हात्रे (Manda Mhatre) यांनीच आपल्याला तक्रार करण्यासाठी प्रवृ्त्त केल्याचे या महिलेने म्हटलं आहे.
तक्रारदार दीपा चव्हाण यांनी गणेश नाईक यांच्याविरोधात असलेली तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस ठाण्यात एक पत्र देखील दिल्याचे समोर आले आहे. गणेश नाईक यांच्यावर आरोप करण्यास भाजपा आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी प्रवृत्त केल्याचे दीपा चौहान यांनी पत्रात नमूद केले आहे. "शिवसेनेतून निवडणुकीसाठी संधी आणि आणि उदरनिर्वाहसाठी पैसे देण्याचे आश्वासन विजय चौगुले यांनी दिले होते. परंतु त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर ते मला टाळू लागले. विजय चौगुले आणि मंदा म्हात्रे यांनी माझा राजकारणासाठी वापर करुन घेतला. या पत्रामुळे जीवितास धोका असून मला काही झाल्यास आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांना दोषी धरण्यात यावे," असेही या महिलेने पत्रात म्हटलं आहे.
दुसरीकडे भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी या पत्राबाबत भाष्य केले आहे. आपण पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहोत. तसेच उपमुख्यमंत्र्यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत असे मंदा म्हात्रे यांनी सांगितले आहे.
नेमकं प्रकारण काय?
काही महिन्यांपूर्वी दीपा चौहान नावाच्या महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीनंतर गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गणेश नाईक हे माझ्याबरोबर गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह अॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहत असून त्यांच्यापासून मला एक मुलगाही झाला आहे. या मुलास वडील म्हणून नाईक यांचे नाव मिळावे यासाठी या गणेश नाईक यांच्याकडे मागणी केली होती. पण त्यांनी यास नकार दिला. त्यानंतर गणेश नाईक यांनी मार्च 2021 मध्ये मला बेलापूर येथील सेक्टर 15 मधील कार्यालयात बोलावून घेतले. तिथे माझ्यावर परवाना असलेले रिव्हॉल्व्हर रोखून तू जास्त बोलू नको. तू काय करणार? मला त्रास देऊ नका नाही तर मी स्वत:ला पण संपवेल आणि तुम्हाला सुद्धा संपवेल, अशी जीवे मारण्याची धमकी दिली, असे दीपा चौहान यांनी तक्रारीत म्हटलं होतं