मुंबई : एकीकडं महाराष्ट्रात स्वबळावर सरकार सत्तेवर आणण्यासाठी भाजपनं (BJP Maharashtra) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर दुसरीकडं भाजपला सत्तेत येऊ देणार नाही, अशी घोषणा शरद पवारांनी (Sharad Pawar) केली आहे. त्यावरून महाराष्ट्रात कसा शिमगा सुरू झालाय, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. (maharashtra political scenario ncp chief sharad pawar and lop devendra fadnvis are critisized to each one)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी व्यक्त केलेला हा विश्वास. मी पुन्हा येईन, असं त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी सांगितलं होतं. भाजपचे 105 आमदार निवडूनही आले. पण शरद पवारांनी महाविकास आघाडीची मोट बांधली आणि भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं.
आता चार राज्यांतल्या विधानसभा निवडणुकीतल्या यशानंतर भाजपनं पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरकार बनवण्याची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर शरद पवारांनीही भाजपचं हे आव्हान स्वीकारलं आहे.
भाजपला रोखण्यासाठी पवारांची खलबतं
भाजपकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका. मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही, असं पवारांनी महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांच्या बैठकीत गुरुवारी सांगितलं. भाजप राजकीय प्रतिस्पर्धी असला तरी त्यांच्या नेत्यांकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत.
परिश्रम घेण्याची तयारी आणि नियोजन त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.
गुरूवारी सायंकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत पवारांची बैठक झाली. या बैठकीतही विधिमंडळात भाजपला आक्रमक प्रत्युत्तर देण्याचा निर्णय झाल्याचं समजतंय. तर पवारांनाही भाजपनं प्रतिआव्हान दिलंय.
चार राज्यातल्या यशानंतर भाजपला दहा हत्तींचं बळ आलंय. त्यात गोव्यात भाजपचं सरकार आणण्यात फडणवीसांचा सिंहाचा वाटा आहे...त्यामुळं फडणवीसांचा आत्मविश्वास दुणावला. तर भाजपच्या महत्त्वाकांक्षेला रोखण्याचा विडा पुन्हा एकदा पवारांनी उचलला आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा फडणवीस विरूद्ध पवारांमध्ये राजकीय आखाडा रंगणार हे नक्की.