विशाल सवने, झी मीडिया, मुंबई : महाविकास आघाडीनं लाडकी बहिण योजनेवर (Ladki Bahin Yojana) टीका केली होती. मात्र, काँग्रेस आमदार झिशान सिद्धकी (Zeeshan Siddique) यांनी मुंबईत उघडपणे अजित पवारांच्या (Ajit Pawar) जनसन्मान रॅलीचं जोरदार स्वागत करत राष्ट्रवादीशी जवळीक वाढवलीय. आमदार या नात्यानं मी त्यांचं स्वागत केलं आहे, असं झिशान यांनी सांगितलं असलं तरीही भाषण करताना त्यांची काँग्रेस विरोधातली आपली खदखद व्यक्त केलीय. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झिशान सिद्धीकी यांचं कौतुक केलंय.
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होतं. गुप्त मतदानामुळे आमदारांची नावं समोर आली नव्हती, परंतु काँग्रेसनं झिशान सह सात जणांना ओळखल्याचं बोललं जातंय. त्यानंतर काँग्रेस आणि झिशान यांच्यात दुरावा निर्माण झालाय. काँग्रेसेचे माजी मंत्री बाबा सिद्धकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर झिशान यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली . जनसन्मान यात्रेत झिशानच्या उपस्थितीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी टायमिंग साधत टोलेबाजी केलीय.
आम्हाला काही गोष्टी यापुर्वीच माहीत होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत कोणी सोडून गेलं तर त्याचा फायदाच होतो असा आमचा अनुभव आहे. नांदेडचे बडे नेते गेले मात्र सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे हे दिसून आलं.
काँग्रेस हा एक विचार म्हणून असलेला पक्ष त्यामुळे कोण गेलं याचा विचार आम्ही करत नाही. कोणी सोडून गेलं तर आम्ही त्या ठिकाणी जोमाने उभे राहतो, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
झिशान यांना अजितदादांचा बदललेला लूक आणि गुलाबी रंगाची भुरळ पडल्याची चर्चा रंगलीय. आता झिशान यांनी उघडपणे जनसन्मान यात्रेचं जोरदार स्वागत केल्यानं ते लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय