संजय राऊत खासदार आहेत हे माझंच पाप आहे - नारायण राणे

Narayan Rane : संजय राऊत पुन्हा एकदा जेलमध्ये जाणार असे नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.  यावर बोलताना नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार असल्यामुळे त्यांची सटकली आहे आणि त्यातूनच ते असली विधानं करत असल्याचा पलवटवार संजय राऊत यांनी केला होता.

Updated: Jan 15, 2023, 11:34 AM IST
संजय राऊत खासदार आहेत हे माझंच पाप आहे - नारायण राणे title=

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या निशाण्यावर आहे. संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यात वेगळाच वाद रंगलाय. संजय राऊत पुन्हा एकदा जेलमध्ये जाणार असे नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले आहे. यावेळी सामनाच्या अग्रलेखाचा उल्लेख करत नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. यावर बोलताना नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार असल्यामुळे त्यांची सटकली आहे आणि त्यातूनच ते असली विधानं करत असल्याचा पलवटवार संजय राऊत यांनी केला होता.

त्यानंतर आता नाराणय राणे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत खासदार झाले, हे माझंच पाप आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून काय केलं? महाराष्ट्रातील कोणत्या शिवसैनिकाचं दु:ख पुसलं, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.

"संजय राऊतला खासदार बनवायचे आहे"

"संजय राऊत हे संपादक आहेत म्हणून त्यांनी चांगले लिहावे. संजय राऊत खासदार आहेत. ते माझंच पाप आहे. एकदा मला बाळासाहेब ठाकरे यांनी बोलावले होते. तेव्हा संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ बसलेले होते.  तेव्हा मी विधीमंडळात विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी मी त्यांना कशाला बोलावले असे विचारले. त्यांनी मला सांगितले की, आपल्याला संजय राऊतला खासदार बनवायचे आहे. उद्या त्याचा फॉर्म भरायचा आहे. त्याला घेऊन जा. खासदार कर. मी बाळासाहेब ठाकरे यांना आयुष्यात कधीही नाही म्हणालो नाही. मी सांगितलं हो करतो. मी दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांना विधानभवनात कागदपत्रे घेऊन बोलावले होते," असे नारायण राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी कोणाला नोकरी दिली?

"उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून काय केलं? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात गेलात? शिवसेना कुठे घेऊन गेलात? कोणत्या शाखेचं उद्घाटन केलं? महाराष्ट्रातील कोणत्या सैनिकाचं दु:ख पुसलं, कोणाला घर दिलं नोकरी दिली? उपासमारीच्या वेळी अन्न दिलं. उद्धव ठाकरेंनी एक तरी उदाहरण द्यावं," अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली

नारायण राणे लाचार माणूस - संजय राऊत

"माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे केंद्रीय मंत्री पद जाणार आहे. परफॉर्मन्स शून्य आहे म्हणून हे सुरु आहे. राणे बाटग्यासारखे वागतायेत. मर्यादा सोडत आहेत.  डरपोक माणसाविषयी विचारु नका, तुम्ही आमचे काय उखडणार, असा थेट सवाल यावेळी राऊत यांनी राणे यांना केला आहे. राणे यांच्या इशाऱ्यानंतर राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. नारायण राणे लाचार माणूस आहे, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. 10 पक्ष सोडून गेलेला माणूस सर्वाधिक डरपोक आहे असं राऊत म्हणाले. राणेंनी पक्ष सोडल्यावर मी भेटलोच नाही, असं संजय राऊत यांनी म्हटले  होते.