Maharashtra Rain : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील काही दिवसांपासून राज्यात पावसानं चांगली हजेरी लावली. गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून अगदी उत्सवाची सांगता होईपर्यंत हा पाऊस सातत्यानं बाप्पांची साथ देताना दिसला. आता बाप्पांना निरोप दिल्यानंतरही हा पाऊस राज्यात आणखी काही दिवस मुक्कामी असणार आहे. पुढील 24 तासांसाठी हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार हा पाऊस कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार बरसणार आहे. तर, मुंबईत मात्र तो उघडीप देताना दिसणार आहे. त्यामुळं इथं शहरात सकाळच्या वेळी तापमानात काही अंशी वाढ झाल्याचं पाहायला मिळेल. तर, शहराच्या उपनगरीय क्षेत्रांमध्ये मात्र पावसाच्या तुरळक सरी बरसतील.
हवामान विभागानं वर्तवलेल्या पावसाच्या पूर्वानुमानानुसार मुंबई आणि पुणे विभागाला यलो अलर्ट दिला आहे. तर, विदर्भातही काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तिथं राजस्थान आणि मध्य प्रदेशातून पावसाचा परतीचा प्रवास सुरु झालेला असतानाच महाराष्ट्रातून हा परतीचा प्रवास 10 ते 14 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर, राज्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर काहीसा ओसरताना दिसणार आहे. ज्यामुळं हवामान विभागानं इथं ग्रीन अलर्टही दिला आहे.
ठाणे आणि पालघर पट्ट्यामध्ये आकाश अंशत: ढगाळ असेल. तर, सातारा, पुणे, कोल्हापूर पट्ट्यात घाटमाथ्यावर ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी बरसताना दिसतील. त्यामुळं एकंदरच हवामानाची स्थिती पाहता घरातून निघताना पावसाची सोय करून तुमचा दिवसभराचा बेत त्यानुसारच आखणंच योग्य ठरणार आहे.