मुंबई : राज्यातील २७ महानगरपालिकामधील महापौर पदाची सोडत काढण्यात आली आहे. खुला प्रवर्ग, सर्वसाधारणसाठी मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, , कल्याण-डोंबिवली, सांगली, उल्हासनगर या पालिकांसाठी सोडत निघाली आहे. २७ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात आज काढण्यात आली.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. आता ही मुदत २१ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन महापौर आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात परिषद सभागृहात ही सोडत काढण्यात आली. या महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. त्यानुसार आरक्षण सोडतीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे किती महापालिकांत महिलांना संधी मिळणार याचीही उत्सुकता होती.
महापौर पदासाठी कोणते आरक्षण पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आरक्षण सोडतीनंतर २१ नोव्हेंबर रोजी नवीन महापौर, उपमहापौरांची निवड होऊ शकते.
- अनुसुचित जमाती - वसई विरार
- अनुसूचित जाती - मीरा भाईंदर
- अनुसूचित जाती ( महिला ) - अहमदनगर, परभणी
- मागास प्रवर्ग ( महिला ) - नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, मालेगाव
- मागास प्रवर्ग - लातूर, धुळे, अमरावती
- खुला प्रवर्ग, महिला आरक्षित - नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, चंद्रपूर
- खुला प्रवर्ग, सर्वसाधारण - मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, सांगली, उल्हासनगर