Human finger In Ice Cream: आपल्यापैकी अनेकजण हल्ली ऑनलाइन फूड डिलेव्हरी अॅप्लिकेशनवरुन पदार्थ मागवतात. घरबसल्या मोबाईलवरुन हव्या त्या हॉटेल, रेस्तराँमधून पदार्थ मागवून आस्वाद घेणारे आपल्यापैकी अनेकजण आहेत. मात्र असाच एक मोह मुंबईमधील मालाड येथील डॉक्टरला फारच महागत पडला. घडलेला हा प्रकार समजल्यानंतर तुम्ही सुद्धा ऑनलाइन माध्यमातून पदार्थ मागवताना अनेकदा विचार कराल.
तर झालं असं की, मालाडमध्ये राहणाऱ्या ऑर्लेम ब्रेडन सेराओ या 27 वर्षीय डॉक्टरने बुधवारी एका फूड डिलेव्हरी अॅपवरुन आईस्क्रीम मागवली. ऑर्लेम यांनी मागवलेला आईस्क्रीमचा कोन आल्यानंतर त्यांनी कव्हर उघडून तो खाण्यास सुरुवात केली. मात्र काही क्षणात त्यांना त्या आईस्क्रीमच्या कोनात तुटलेलं हाताचं बोट सापडलं. हे बोट दोन सेंटीमीटर लांब होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीला आईस्क्रीमच्या कोनमध्ये हे बोट सापडलं आहे ती व्यक्ती पेशाने डॉक्टर आहे. या व्यक्तीने एमबीबीएसपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. या व्यक्तीच्या बहिणीने घरातील किराणा मालाचं सामान ऑनलाइन मागवलं तेव्हाच या आईस्क्रीम कोनची ऑर्डर देण्यात आली होती. आता या प्रकरणाची दखल मालाड पोलिसांनी घेतली असून तपास सुरु केला आहे.
हे आईस्क्रीम आणून देणारी व्यक्ती कोण होती? या व्यक्तीने आईस्क्रीम नेमकी कुठून पिक केली? ज्या दुकानामध्ये ही आईस्क्रीम आली तिथे ती कोणत्या डिलरमार्फत आली? हा डिलर कुठून या आईस्क्रीम आणतो? यासारख्या प्रश्नांचा आता पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे. दरम्यान या साऱ्या प्रकारामध्ये डिलेव्हरी करणाऱ्या व्यक्तीने तर काही फेरफार केला नाही ना? या दृष्टीकोनातूनही तपास केला जाण्याची शक्यता आहे.
हे आईस्क्रीमचे कोन कुठे तयार केले जातात त्या कारखान्यांमध्ये जाऊन पोलीस तपास करणार आहेत. आईस्क्रीम तयार केली जाते त्या ठिकाणी जाऊन चौकशी केल्यास हे बोट कोणाचं आहे याचा माग लागू शकतो असा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी हे बोट फॉरेन्सिक चाचण्यांसाठी लॅबमध्ये पाठवलं असून लवकरच यासंदर्भातील अहवाल पोलिसांना दिला जाणार आहे. मात्र या प्रकारामुळे ऑनलाइन माध्यमातून पदार्थ तसेच वस्तू मागवण्यासंदर्भातील शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. अशाप्रकारे ऑनलाइन गोष्टी मागवणे किती सुरक्षित आहे असा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.