मुंबई : मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेय. या याचिकेचा निर्णय आता १६ जुलै रोजी होणार आहे. या याचिकेवर आज अंतिम निर्णय येण्याची शक्यता होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय १६ जुलैपर्यंत राखून ठेवला आहे. कर्नल पुरोहित यांच्याविरोधात खटला चालवण्यास सरकारने दिलेल्या मंजुरीचा निर्णय रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर खटल्यातून दोषमुक्त करण्याची त्यांची मागणी विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयाने फेटाळून लावली होती.
मालेगावमधील बॉम्बस्फोटांप्रकरणी १० वर्षांपूर्वी कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक झाली होती. ऑगस्ट २०१७ मध्ये कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. कर्नल पुरोहित यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. आपल्याला दोषमुक्त करावे, अशी त्यांची मागणी आहे.
तसेच यापूर्वी त्यांनी केलेल्या आणि उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेल्या सर्व निर्णयांना आव्हान देण्याची मागणीही पुरोहित याने याचिकेद्वारे केली आहे. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आपल्यावर आरोप ठेवण्यापूर्वी लष्कराची परवानगी घेण्यात आली नसल्याने, आपल्याविरोधात खटलाच दाखल करता येत नाही, असे सांगत आरोपमुक्त करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावर आज निर्णय अपेक्षित होता, पण तो झाला नाही.
'मोक्का'अंतर्गत ठेवण्यात आलेले आरोप विशेष न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित यांनी ही मागणी केली होती. या दोन्ही निर्णयांविरोधात पुरोहित यांनी नव्याने याचिका केली आहे. त्यांच्या याचिकेवर हायकोर्ट शुक्रवारी निर्णय देण्याची शक्यता आहे.
मालेगाव स्फोटाप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यानंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना जामीन मंजूर झाला. सर्वोच्च न्यायालयाने ९ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या कर्नल पुरोहित यांना २१ ऑगस्ट २०१७ रोजी जामीन मंजूर केला आहे.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावत एका दुचाकीमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यानंतर स्फोटासाठी आरडीएक्स पुरवणं आणि कट रटल्याच्या आरोपाखआली साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली होती. या स्फोटात ७ जणांचा जीव गेला होता. तर ८० हून अधिक लोक जखमी झाले होते.