मुंबई : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रथम मेट्रो कोचची कोनशिला बसविण्यात आली. ही कोनशिला हिंदी भाषेत असून प्रथम मेट्रो कोचच्या कोनशिला मराठी भाषेत बनवून बसविण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रविंद्र वायकर, मुख्य सचिव अजोय मेहता,मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव आणि एमएमआरडीए महानगर आयुक्त आर ए राजीव यांस पाठविलेल्या पत्रात एमएमआरडीए प्रशासनाची घोडचूक अवगत केली आहे.
राज्याच्या धोरणानुसार महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेचा वापर आवश्यक असताना ही कोनशिला हिंदी भाषेत बसविली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे देखील मराठी भाषा संवर्धनासाठी नेहमी आग्रही असतात.
असे असताना दुर्दैवाने हा आग्रह एमएमआरडीए प्रशासनाकडून पाळला गेला नाही तसेच मराठी भाषेचा अपमान करण्यात आल्याची खंत व्यक्त अनिल गलगली यांनी व्यक्त केली.
याबाबत चौकशी करत ज्या अधिकारी वर्गाच्या चुकीमुळे मराठी भाषेतील कोनशिला बसविली गेली नाही.
तसेच नियमाप्रमाणे कार्यवाही करत प्रथम मेट्रो कोचच्या कोनशिला मराठी भाषेत बनवून बसवावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.