मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत भाजपला धक्का दिल्यानंतर आता राज्यात भाजप-मनसे असे नवे राजकीय समीकरण आकाराला येण्याचे संकेत मिळत आहेत. मंगळवारी संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रभादेवीच्या इंडिया बुल्स स्काय या हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडल्याचे समजते. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा सुरु होती.
या भेटीबद्दल दोन्ही नेत्यांकडून पूर्णपणे गुप्तता बाळगण्यात आली होती. बैठक आटोपल्यानंतर राज ठाकरे हॉटेलच्या मागच्या प्रवेशद्वाराने बाहेर पडले. तर फडणवीस हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडल्याची दृश्ये प्रसारमाध्यमांनी टिपली आहेत.
राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर मनसे आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. गेल्या काही काळात अनेक ठिकाणी राज ठाकरे यांनी भाजपला पूरक भूमिका घेतल्याचेही सांगितले जात होते. मात्र, तरीही भाजप आणि मनसे एकत्र येण्याच्यादृष्टीने ठोस असे काही घडत नव्हते. अखेर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या भेटीने अशा हालचाली प्रत्यक्षात सुरु असल्याच्या दाव्याला बळ मिळाले आहे.
येत्या २३ जानेवारी रोजी मुंबईत मनसेचे महाअधिवेशन पार पडणार आहे. त्यावेळी राज ठाकरे मोठी घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याचा रंगही बदलणार असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारे, केशरी किंवा भगवा रंग असलेला ध्वज स्वीकारला जाऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरे हिंदुत्वाचा नवा मुद्दा उचलून धरतील, असा जाणकारांचा होरा आहे. ही गोष्ट भाजपच्या पथ्यावर पडू शकते. त्यामुळे भविष्यात भाजप आणि मनसे एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.