मुंबई : बेस्टचा संप आठव्या दिवशीही सुरुच आहे. कामगार वेतन आणि बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करुन घेण्यासाठी हा संप पुरकारण्यात आला आहे. मात्र, 'मातोश्री'कडून या संपकरण्यांना संपवायचे आहे. त्यासाठी खासगिकरणाचा डाव आखला जात आहे, असा थेट आरोप बेस्ट कामगार कृती समितीचे निमंत्रक नेते शशांक राव यांनी केला आहे. ते म्हणालेत, 'बेस्ट संप हा अस्तित्वाचा लढा आहे, शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावर आत्महत्येची वेळ आणण्याचा प्रयत्न आहे.' यावेळी लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नाही, असे सांगतानाच उच्चाधिकार समितीचा नवा प्रस्ताव म्हणजे बेस्ट कामगारांचे मृत्यूपत्र असल्याची घणाघाती टीका राव यांनी केली.
बेस्ट कामगारांचा संप यापुढंही सुरूच राहणार असल्याचे यावेळी शशांक राव यांनी स्पष्ट केले आहे. वडाळा बेस्ट कामगार वसाहतीत कामगारांसमोर भूमिका मांडताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. संपात हस्तक्षेप करण्यापासून मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंनी अडवले, असा आरोप राव यांनी केला आहे. गेल्यावेळी चूक झाली, मात्र यावेळी लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नाही, असं सांगतानाच उच्चाधिकार समितीचा नवा प्रस्ताव म्हणजे बेस्ट कामगारांचं मृत्यूपत्र असल्याची घणाघाती टीका राव यांनी केली.
बेस्टचा संप सुरूच राहणार आहे. कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, असाच निर्धार बेस्ट कर्मचारी संघटनेचे नेते शशांक राव यांनी केला. तर दुसरीकडे बेस्टच्या संपाच्या आठव्या दिवशीही उच्च न्यायालयात तोडगा निघालेला नाही. आता आणखी चर्चा सुरू ठेवण्यात अर्थ नाही, असे न्यायालयानं स्पष्ट केले आहे. बेस्ट कर्मचार्यांचा संप मिटवण्यासाठी उच्चाधिकार समितीने १० टप्प्यांची पगारवाढ सुचवली. पण वेतनाचे १० टप्पे कमी आहेत, २० टप्पे हवे, अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे.
संप मागे घ्या, कोणावरही कारवाई केली जाणार नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत. संप करून मागण्या मान्य करून घेणे म्हणजे आमच्या डोक्यावर बंदूक ठेवण्यासारखे आहे. आम्ही कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी तयार आहोत पण संपावर राहून नाही, असे बेस्ट समितीने न्यायालयात सांगितले. पण कर्मचारी संघटना त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कर्मचारी संघटना, यांच्यात वाद कायम आहे.