Mumbai Local News : दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवाशांचा प्रवास सुकर करत त्यांना अपेक्षित स्थळी पोहोचवणाऱ्या रेल्वे विभागाच्या वतीनं आणि त्यातही मुंबईल लोकलच्या दृष्टीनं सतत काही मोठे आणि तितकेच महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. या निर्णयांचा प्रवाशांवर थेट परिणाम होतो म्हणण्यापेक्षा या निर्णयांचा त्यांना फायदाच होत असतो. असाच एक नवा निर्णय घेत रेल्वे विभागानं पुन्हा एकदा प्रवाशांचा आणि त्यातूनही रेल्वे प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत काही महत्त्वाच्या सुविधा लागू करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
मध्य रेल्वेच्या (Central Railway) वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार येत्या काळात 117 रेल्वे स्थानकांवर पॅनिक बटण बसलण्यास येणार आहेत. मध्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक राम करण यादव यांनी गुरुवारी माध्यमांना संबोधित करत यासंदर्भातील माहिती दिली. जिथं त्यांनी 117 स्थानकांवर प्रत्येकी 2 पॅनिट बटणं बसवणार असल्याचं स्पष्ट केलं.
कोणत्याही संकटसमयी प्रवाशांसाठी हे बटण मदतीचं ठरणार आहे. हे बटण दाबून प्रवाशांना, विशेष करून महिला प्रवाशांना तातडीनं आरपीएफची मदत घेत येणार आहे. यासाठी सध्या रेल्वेच्या वतीनं ही प्रणाली राबवण्यासाठीची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. हे बटण दाबल्यानंतर आरपीएफच्या नियंत्रण कक्षाला सतर्क केलं जाईल आणि तातडीनं सीसीटीवीच्या वापरातून प्रवाशांपर्यंत मदत पोहोचवली जाईल.
कशी आहे ही यंत्रणा
रेल्वे प्लॅटफॉर्मच्या दोन्ही दिशांना पॅनिक बटणं असतील. महिला डब्यासमोर सहज दिसणाऱ्या ठिकाणी ही बटणं असणार आहेत. बटण दाबताच अलार्म सुरू होऊन लाल दिवा पेटेल आणि सीसीटीव्ही संबंधित प्रवाशाला टिपू शकेल.
या वर्षअखेरीस ही कामं पूर्ण होणार असून, येत्या काळात महिलांची सुरक्षितता लक्षात घेत येत्या काळात मध्य रेल्वेच्या 771 महिलांसाठी आरक्षित डब्यांमद्ये सीसीटीव्ही आणि टॉकबॅक सिस्टीम सुरु करण्यात येणार आहे. यापैकी 512 डब्यांमध्ये Emergency Talkback आणि 421 डब्यांमध्ये सीसीटीव्ही सुरुही करण्यात आले आहेत.