मुंबई : मुंबई महापालिका (BMC) कर्मचाऱ्यांनी यंदा 25 हजार दिवाळी बोनसची (Diwali Bonus) मागणी केली आहे. या मागणी बाबत मुंख्यमंत्र्यांसोबत (CM Eknath Shinde) दोन दिवसात बैठक होणार असून यावर शिक्कामोर्तब होणार आहे. महापालिका प्रशासक इकबाल चहल (Iqbal chahal) यांनी यासाठी कृती समितीची बैठक बोलावली होती. कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त देण्यात येणाऱ्या बोनससंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. (Diwali Bonus for BMC staff)
मुंबई महापालिका कामगार संघटनांचे नेतेही या बैठकीला उपस्थित होते. मागील वर्षी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना वीस हजार बोनस दिला होता. आता नवे मुख्यमंत्री किती बोनस वाढवून देतात याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
मागच्या वर्षी म्हणजेच 2021 साली खालील प्रमाणे बोनस देण्यात आला होता.
1. महापालिका आणि बेस्ट अधिकारी / कर्मचारी, प्राथमिक शिक्षकः रु. 20,000/- 2. माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी, अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते व शिक्षकेतर कर्मचारीः 10,000/- 3. प्राथमिक शिक्षण सेवकः रु. 5,600/- 4. आरोग्य सेविकाः रु. 5,300/- 5. विनाअनुदानित माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळा शिक्षण सेवकः रु. 2,800/-
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड होऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय निर्णय घेतात याकडे आता सर्व कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.