Mumbai News : मुंबई ते मांडवा M2M फेरीनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. दर दिवशी आणि त्यातही वीकेंडच्या दिवसांना या सागरी मार्गानं प्रवास करणाऱ्यांना रो-रो फेरीच्या माध्यमातून जलवाहतुकीचा एक वेगळा अनुभव घेता येतो. पण, आता मात्र हाच प्रवास एका वेगळ्या कारणामुळं चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. जवळापास विशी ओलांडलेल्या एका इसमानं रो-रो जहाजातून उडी मारत आत्महत्या केल्याचा संशय सध्या व्यक्त केला जात आहे.
रो-रो मांडवा (Mumbai - Mandva) जेट्टीपाशी पोहोचत असतानाच हैदराबादच्या या इसमानं सोमवारी सकाळी रो-रो जहाजाची फेरी सुरू असताना त्यातून समुद्रात उडी मारली. स्थानिक पोलीस यंत्रणा आणि मासेमारांनी या भागात जवळपास 6 तासांसाठी शोधमोहिम हाती घेत त्या व्यक्तीचा शोधही घेण्याचा प्रयत्न केला. पण, नियामुद्दीन चौधरी नावाच्या या इसमाचा कुठंही शोध लागला नाही.
अधिक माहिती समोर आली असता नियामुद्दीन हा मुळचा आसामचा असून तो हैदराबाद येथे कामानिमित्त आला असल्याचं कळलं. त्यानं मुंबईतील भाऊचा धक्का येथून Ro-Ro M2M बोटनं प्रवास सुरु केला. सोमवारी सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास हा प्रवास सुरु झाला. ज्यानंतर बोट मांडवा जेट्टीपासून साधारण 1.5 सागरी मैल दूर असतानाच त्यानं समुद्रात उडी मारली आणि बोटीवर असणाऱ्या इतर प्रवाशांच्या पायाखालची जमीन सरकली.
मांडवा येथील सहायक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार बोटीवरून एक व्यक्ती पडल्याची माहिती समोर येताच तपास यंत्रणांनी CCTV फूटेज तपासून पाहिले. ज्यामध्ये बोटीवर बसलेल्या एक व्यक्ती उभी राहत असून, बोटीच्या टोकाशी गेसी आणि त्यानं समुद्रात उडी मारल्याचं स्पष्ट दिसलं.
उडी मारणाऱ्या व्यक्तीनं तोंडावर रुमाल बांधल्यामुळं सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसू शकला नाही. कालांतरानं जहाजातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींची यादी समोर आल्यानंतर या व्यक्तीची माहिती मिळू शकली. उडी मारणाऱ्या व्यक्तीसोबत मोबाईलही गेला असून, त्याचं कोणतंही सामान बोटीवर नव्हतं. त्यामुळं सध्यातरी त्यानं हे पाऊल का उचललं इथपासून तो कुठं काम करत होता इथपर्यंतची माहिती देण्यास मात्र पोलिसांनी नकार दिल्याचं सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान, या प्रकरणी आता पुढील तपास सुरु असल्याचं पोलीस यंत्रणा आणि एमटूएमशी संलग्न अधिकारी सांगताना दिसत आहेत.