एमबीए करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; अखेर मुंबईलाही मिळालं IIM

IIM Mumbai : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (सुधारणा) विधेयक 2023 ला लोकसभा आणि राज्यसभेतून मंजुरी मिळाल्यानंतर आता राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (NITIE) अधिकृतपणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई म्हणून ओळखली जाणार आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 18, 2023, 08:27 AM IST
एमबीए करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; अखेर मुंबईलाही मिळालं IIM title=

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्योग आणि अभियंता प्रशिक्षण संस्था अर्थात NITIE ला आता आय आय एमचा (IIM Mumbai) दर्जा बहाल करण्यात आला आहे. यासंबंधीचा जीआर 16 ऑगस्टला जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आयआयटी पवईला लागूनच असणाऱ्या राष्ट्रीय उद्योग आणि अभियंता प्रशिक्षण संस्थेचं नाव बदलण्यासंदर्भात आयआयएम स्थापना कायद्यात बदल करण्यात आला होता. या बदलाचा जीआर 16 ऑगस्टला जारी करण्यात आला आहे. NITIE ही संस्था गेली चार दशकं मुंबईत जागतिक दर्जाचे अभियंते आणि व्यवस्थापन तज्ज्ञ घडवण्याचे काम करत आहे. आता याच संस्थेला आयआयएमचा दर्जा आणि नाव देण्यात आल्यानं देशाला 21वे आयआयएम मिळाले आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (सुधारणा) विधेयक लोकसभेत मांडण्यात आले होते. याद्वारे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅक्ट, 2017 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग मुंबई हे भारतीय व्यवस्थापन संस्था मुंबई म्हणून ओळखले जाईल असा एक नवीन सुधारणा त्यात जोडण्यात आली होती. यामध्ये संचालक मंडळाचे निलंबन किंवा विसर्जन झाल्यास अंतरिम मंडळ स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला असेल. या अंतर्गत भारताचे राष्ट्रपती प्रत्येक संस्थेचे अभ्यागत असतील असेही सांगण्यात आले होते. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हे विधेयक कनिष्ठ सभागृहात मांडले होते. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट दुरुस्ती विधेयक कनिष्ठ सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मुंबईतील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्योग आणि अभियंता प्रशिक्षण संस्थेला आयआयएमचा दर्जा दिल्याने मुंबईतील एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यासह देशातील आयआयएमची संख्या 21 झाली आहे. मुंबईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगला आयआयएमचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे येथे शिकणाऱ्या विद्यमान विद्यार्थ्यांना आतापासून आयआयएमची पदवी मिळणार आहे. इथल्या पुढील सत्रासाठी म्हणजेच 2024-26 बॅचसाठी CAT द्वारे एमबीएचे प्रवेश सुरू होणार आहेत.

सध्या या संस्थेत सुमारे 1200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुढील वर्षी ही संख्या दुप्पट करण्याच्या उद्दिष्टावर संस्थेने काम सुरू केले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग, मुंबई हे प्रतिष्ठित संस्थांच्या यादीत आधीच समाविष्ट आहे. NIRF 2023 रँकिंगमध्ये बिझनेस स्कूल श्रेणीमध्ये हे सातव्या क्रमांकावर आहे.

‘आयआयएम’मध्ये किती शुल्क आहे?

आयआयएम-रोहतक – 16.10 लाख

आयआयएम-काशीपूर – 15.42 लाख

आयआयएम-त्रिची – 16.50 लाख

आयआयएम अहमदाबाद – 23 लाख

आयआयएम बंगळुरू – 23 लाख

आयआयएम-कोलकाता – 27 लाख

आयआयएम-लखनऊ – 19.25 लाख

आयआयएम-कोझिकोड – 22.50 लाख

आयआयएम-इंदोर – 20.06 लाख

आयआयएम-शिलॉंग – 14.50 लाख

आयआयएम-रायपूर – 14.20 लाख

आयआयएम-रांची – 16.30 लाख

आयआयएम-उदयपूर – 17.90 लाख

आयआयएम-अमृतसर – 13.20 लाख

आयआयएम-बुद्धगया – 12.95 लाख

आयआयएम-संबलपूर – 13.03 लाख

आयआयएम-सिरमौर – 11.75 लाख

आयआयएम-विशाखापट्टणम – 16.59 लाख

आयआयएम-जम्मू – 15.56 लाख