Mumbai Sextortion Case: मुंबईमधील एका 30 वर्षीय व्यक्तीला ऑनलाइन सेक्सटॉर्शनच्या (Sextortion) माध्यमातून 3 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. अंधेरीमध्ये (Andheri) हा प्रकार घडला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाची माहिती सोमवारी जारी केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली. व्हॉट्सअप कॉलनंतर (Whatsapp Call) विवस्त्र फोटो (Nude Photo) सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी या व्यक्तीला आरोपींनी दिली. ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीने हा व्हिडीओ हटवण्यासाठी पैशांची मागणी केली. ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीला देण्यासाठी फसवणूक झालेल्या व्यक्तीकडे पैसे उरले नाही तेव्हा त्याने शनिवारी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
एका खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला 22 फेब्रुवारी रोजी व्हॉट्सअपवर एका अज्ञात क्रमांकावरुन कॉल आला. या व्हिडीओ कॉलमध्ये समोर एक महिला विवस्त्र अवस्थेत उभी असल्याचं दिसत होतं. मात्र या महिलेचा चेहरा या व्हिडीओ कॉलमध्ये दिसत नव्हता. या व्यक्तीने लगेच फोन कॉल कट केला. दुसऱ्या दिवशी अन्य एका क्रमांकावरुन फोन आला ज्यामध्ये कॉल करणाऱ्या व्यक्तीने तुमचा एक विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ युट्यूबवर आहे असं सांगितलं. तसेच हा व्हिडीओ काढून टाकायचा असेल तर 31,500 रुपये दे असंही या व्यक्तीला ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं.
ब्लॅकमेल करणारी व्यक्ती एवढ्यावर थांबली नाही तर यानंतरही दोन वेगवेगळे कॉल करुन व्हिडीओ हटवण्यासाठी 62,500 रुपये देण्याची मागणी केली. त्यानंतर ब्लॅकमेल करणाऱ्याने पुन्हा कॉल करुन या व्यक्तीकडून 1.51 लाख रुपयांची मागणी केली. अशाप्रकारे या ब्लॅकमेलरने या व्यक्तीकडून 3 लाख 6 हजार रुपये घेतले. पुन्हा ब्लॅकमेलरचा कॉल आला तेव्हा आपल्याकडे पैसेच शिल्लक नसल्याचं या व्यक्तीने सांगितलं असता आता तुझा व्हिडीओ रिलीज करणार असं सांगत धमकावलं. यानंतर या व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली.
अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 420 म्हणजेच फसवणूक आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करत आहेत.