मांडीला छिद्र पाडून केली डोळ्याची यशस्वी शस्त्रक्रिया

  मुंबईच्या सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी एका 12 वर्षीय मुलाला अनोखं दिवाळी गिफ्ट दिलंय. 

Updated: Oct 19, 2017, 09:43 PM IST
 मांडीला छिद्र पाडून केली डोळ्याची यशस्वी शस्त्रक्रिया  title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई  :  मुंबईच्या सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी एका 12 वर्षीय मुलाला अनोखं दिवाळी गिफ्ट दिलंय. 

तीन वर्षांपूर्वी खेळताना जखम होऊन डाव्या डोळ्याच्या आतील भागातील नस तुटल्यानं त्याची दृष्टी कमी होत चालली होती. अनेक ठिकाणी दाखवूनही उपचार होत नसताना सायन रुग्णालयाचा रेडिओलॉजी विभाग या मुलाच्या मदतीला धावला. 

उत्तर प्रदेशातील गोरखपूरचा हा 12 वर्षांचा कृष्णा विश्वकर्मा.... तीन वर्षापूर्वी भावासोबत खेळत असताना त्याच्या डाव्या बाजूच्या डोळ्याला टोकदार वस्तू लागल्यानं आतील बाजूस मेंदूला रक्तपुरवठा करणा-या दोन नसपैकी एक नस फुटली. यामुळं रक्तपुरवठा डोळ्यांमध्ये होऊ लागल्यानं डावा डोळा सुजण्याबरोबरच तो बाहेर येऊ लागला. 

तसंच या डोळ्याची दृष्टीही अधू होऊ लागली. डाव्या बाजूच्या डोळ्यानं त्याला एक वस्तू दोन दिसत असंत. यावर उपचार करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला गोरखपूरमधील रुग्णालयांबरोबरच नेपाळमधील रुग्णालयातही दाखवलं. 

मात्र, उपचार काही झाले नाहीत. अखेर मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारत एक अवघड शस्त्रक्रिया पार पडली. 

 सायन रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी अवघड आणि दुर्मिळ अशी ही पाच तास पिनहोल सर्जरी केली. 
 
 यासाठी कुठेही शरीराची चिऱफाड न करता मांडीजवळ केवळ 2 मिमीचे छिद्र पाडले आणि पायांच्या नसमधून मायक्रो कॅथेटर आणि मायक्रो वायरच्या माध्यमातून डोळ्या मागील फुटलेली नस पूर्ववत केली. विशेष म्हणजे या केसमध्ये मेंदुला जाणारी रक्तवाहिनी वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं.

 ही शस्त्रक्रिया करण्यासाठी इंग्लंडहून डॉक्टर तुफेल पाटणकर सायन रुग्णालयात आले होते. या डॉक्टरांच्या टीमनं या 12 वर्षीय मुलाला एक अनोखं दिवाळी गिफ्ट दिलंय. जे त्याला आयुष्यभरासाठी पुरणार आहे...