मुंबई : मान्सूनचं आगमन यावर्षी लवकरच होण्याची शक्यता आहे... त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांची जीवनवाहिनी ठप्प होऊ नये यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने कामांना धडाक्यात सुरूवात केलीय. पावसाळ्यात रूळांवर पाणी साचून रेल्वेसेवा ठप्प होण्याची प्रसंग अनेकदा घडतात. मात्र यावर्षी असे प्रसंग उदभवू नयेत यासाठी रेल्वे प्रशासाने कामाला सुरूवात केली आहे. रूळांमधील कचरा काढणे, नाल्याची साफसफाई, अनेक ठिकाणी वृक्ष छाटणी या कामांना सुरूवात झालीय.
मध्य रेल्वेने नालेसफाईतून ८० घनमीटर गाळ काढलाय. रेल्वे हद्दीतल्या ७० भूमीगत नाल्यांचीही सफाई केलीय. मध्य आणि हार्बर मार्गावर पाणी साचणाऱ्या १० स्थानकांवर पाणी उपसा पंप बसवण्यात आलेत. मुंबई मनपानेही त्यांच्या हद्दीत १६ पंप बसवलेत. पुराच्या पाण्याच्या पातळीचा इशारा देणारे इंडिकेटर बसवण्यात आलेत. हवामान खाते आणि आपत्कालीन विभाग यांच्याशी समन्वय साधण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आलीय. सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड न येण्यासाठी डिटीटल एक्सेल बसवण्यात आलेत. दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी दुरूस्ती करण्यात आलीय. मुंबई पुणे आणि मुंबई नाशिक मार्गावर घाट सेक्शनमध्ये सर्वेक्षण करण्यात आलंय. दरडी कोसळण्याच्या ठिकाणी अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आलाय. मुंब्रा, कळवा, ठाणे, मुलुंड, करी रोड या गर्दीच्या स्थानकांवर पाऊस आल्यावर उभं राहण्यासाठी होल्डींग एरिया तयार करण्यात आलाय.
पश्चिम रेल्वेनेही पावसाळापूर्व कामं करण्यावर भर दिलाय. मरीन लाईन्स, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा, मिरा रोड, माहिम, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, नालासोपारा, विरार आदी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता गृहीत धरून १०० पाणीउपसा पंप बसवण्यात आलेत. सिग्नल यंत्रणा, टेलिकम्युनिकेशन यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांचीही दुरूस्ती करण्यात आलीय. पश्चिम रेल्वेवरील ४० नाल्यांची सफाईही करण्यात आलीय. रेल्वेने मान्सून पूर्व कामं तर जोरदार सुरू केली आहेत. आता ही कामं खरंच कितपत झालीयेत हे प्रत्यक्ष पावसाळ्यात समजेलच...