Mumbai Weather: संक्रातीनंतर मुंबईकरांना गारवा जाणवू लागला आहे. मुंबईमध्ये किमान तापमान पुन्हा एकदा 20 अंश सेल्सिअसच्या खाली घसरलंय. यावेळी सोमवारी किमान तापमान 18.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं होतं. अशातच बुधवारपर्यंत तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी उपनगरामधील कमाल तापमान 34.6 अंश सेल्सिअस होतं. तर शहराचं 32.6 अंश सेल्सिअस इतके होते.
20 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असणारं उपनगरातील किमान तापमान 18 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं होतं. मध्य महाराष्ट्रात निर्माण झालेली हाय प्रेशर सिस्टीम आता पूर्वेकडे सरकल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. अशा परिस्थितीत उत्तरेकडून कोकणाकडे येणारे वारे कोणत्याही न थांबता मुंबईत दाखल होणार आहेत.
हवामानतज्ज्ञ राजेश कपाडिया यांच्या सांगण्यानुसार, साधारणपणे डिसेंबर महिन्यात उपनगरामध्ये सरासरी कमाल तापमान 32.6 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18.4 अंश सेल्सिअस असायला हवं होतं. मात्र यावेळी कमाल तापमान 33.5 अंश सेल्सिअस तर किमान 21.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या वेळी 6 जानेवारी रोजी आतापर्यंत सर्वात कमी 17.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.
प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत चांगली थंडी न पडण्याची अनेक कारणे आहेत. अरबी समुद्रात काही सिस्टम तयार झाल्या आहेत. त्याचप्रमाणे नैऋत्येकडून वारे वाहत असून आणि उत्तरेकडे म्हणावी तशी बर्फवृष्टी झालेली नाही. उत्तरेकडे चांगली बर्फवृष्टी झाली, तर कोकणाच्या दिशेने येणारे थंड वारे तापमानात घट आणतात. यावेळी बर्फवृष्टीही उशिरा सुरू झाल्याने मुंबईत थंडी वाढण्याची शक्यता फारच कमी आहे.
मध्य महाराष्ट्रात निर्माण झालेली हाय प्रेशर सिस्टीम आता पूर्वेकडे सरकल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय. उत्तरेकडून कोकणाकडे येणारे वारे कोणत्याही निर्बंधाशिवाय मुंबईत दाखल होण्याचीस शक्यता आहे. बुधवारपर्यंत मुंबईचं किमान तापमान 17 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.