मुंबई : नवरात्र महोत्सवाची सांगता होत असताना आता माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेय. हा महोत्सव शुक्रवार ते रविवार म्हणजेच १९ ते २१ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलाय. जुहू किनाऱ्यानजीक मालिनी किशोर संघवी शांतीप्रभा प्रेक्षागृहात ‘सहावा माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ साजरा होणार आहे. या महोत्सवाला सिनेसृष्टीतल्या दिग्गजांची उपस्थिती असणार आहे.
'युनिव्हर्सल मराठी' आणि 'रितंभरा विश्व विद्यापीठाचे मालिनी किशोर संघवी कॉलेज' यांच्या संयुक्त विद्यमानाने होणाऱ्या या महोत्सवात जगभरातील लघुपटकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे. या तीन दिवसीय महोत्सवात सिनेसृष्टीतील भूत-वर्तमान-भविष्य काळातील महत्वपूर्ण विषयसंबंधित विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.
या महोत्सवात लघुपटकारांसाठी फिल्म स्क्रीनिंग, पॅनल डिस्कशन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चित्रपटसृष्टीतले तज्ज्ञ, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी चर्चा आणि प्रश्नोतरे यासारख्या कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. भारतात आणि प्रामुख्याने मुंबईसारख्या अठरापगड वस्ती असलेल्या शहरात लघुपट संस्कृती विकसित व्हावी, आशयसंपन्न लघुपटाच्या माध्यमातून दैनंदिन जगण्यातील अनेक समस्या अधिक प्रकर्षांने लोकांपुढे याव्यात, या विचाराने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेय.
सामाजिक जनजागृती शॉर्ट फिल्म (सोशल अवेरनेस), आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म (विदेशी फिल्म), अॅनिमेशनपट, कल्पनारम्य (फिक्शन) फिल्म, जाहिरातपट (अॅडफिल्म), संगीतपट (म्युझिक व्हिडियो) आणि माहितीपट (डॉक्युमेंटरी) अशा या सात वर्गवारी करण्यात आल्या होत्या. यावर्षीच्या महोत्सवात सहभागी लघुपटांची एकूण संख्या १५०० हुन अधिक असून ६ उपखंड, ८३ हुन अधिक देश असा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.
ओपन माईंड प्रोडक्शन या संस्थेच्या सहयोगाने दि. १९ ऑक्टोबर ला सकाळी ११:३० वाजता सिनेसृष्टीतील लेखकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्तुत कार्यशाळेत सल्लागार तेजस्विनी पटवर्धन यांचे कृतीमार्गदर्शन लाभणार आहे.
'प्रभात चित्र मंडळ' यांच्या सहयोगाने दि. २० ऑक्टोबर ला संध्याकाळी ५ वाजता 'लघुपट निर्मिती आणि आर्थिक नफा' ह्या विषयावर पॅनल डिस्कशनचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सिनेसृष्टीतील मान्यवर तज्ज्ञ, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्ममेकर्स यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
फ्लिक्समेट्स या संस्थेच्या सहयोगाने दि. २१ ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता सिनेसृष्टीत काम करणाऱ्यांसाठी तसेच त्यात प्रदार्पण करणाऱ्या नवोदितांसाठी कौशल्यानुरूप काम कसे मिळवावे ? यासाठी तंत्रमार्गदर्शन करणार आहे. २१ ऑक्टोबरला पारितोषिक वितरण समारंभासाठी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रत्येक लघुपट वर्गवारीतून प्रत्येकी एक ‘बेस्ट शॉर्टफिल्म’ विजेता आणि सर्वोत्तम कामगिरी करणा-याना वैयक्तिक तांत्रिक अॅवॉर्ड (टेक्निकल अॅवॉर्ड) देऊन गौरविण्यात येईल. लघुपट वर्गवारीतील सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येईल. महोत्सवाच्या www.mmisff.com या संकेतस्थळावर नाव नोंदवून विनामूल्य प्रवेश घेता येईल. अधिक माहितीसाठी ९७६८९३०८५३ या क्रमांकावर तसेच ‘युनिव्हर्सल मराठी’च्या फेसबुक पेजवर संपर्क साधता येईल.