दीपक भातुसे / मुंबई : नाना पटोले (Nana Patole) आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा (Resign as Assembly Speaker) दिला आहे. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव अंतिम झाल्याने राजीनामा दिला आहे. काल पटोले यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर हालचालींना वेग आला होता. सह्याद्री अतिथीगृहावरून नाना पटोले विधानभवनावर दाखल होत त्यांनी आपला राजीनामा दिला. (Nana Patole resigns as Assembly Speaker)
काल बुधवारी नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष पद मिळणार अशी चर्चा सुरु झाली होती. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, इतर मंत्र्याची भेट घेऊन नाना पटोले आभार मानणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतरच विधानसभेत येऊन नाना पटोले राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता आज खरी ठरली आहे. आता काँग्रेसचे नवे प्रदेश अध्यक्ष म्हणून नाना पटोले हे असणार आहे.
सध्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रदेश अध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिले होते. नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी त्यांनीच मागणी केली होती. त्यामुळे काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता होती. मात्र, नाना पटोले हे नवे अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.