मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली.
पावसाळयात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत असून ऐनवेळी मदत आणि बचावकार्य करण्याची वेळ येऊ नये म्हणून पहिल्यांदाच एनडीआरएफच्या 9 तुकड्या 7 जिल्ह्यांमध्ये अगोदरपासूनच तैनात करण्यात आल्याची माहिती आज मान्सूनपूर्व आढावा बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिली.
ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर इथं प्रत्येकी एक टीम 15 जूनपासून पोहोचतील. याच पद्धतीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एसडीआरएफची एक तुकडी नांदेड आणि एक तुकडी गडचिरोली इथे 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत तैनात करण्यात येईल.
मुंबईकरांसाठी नियंत्रण कक्ष
मुंबई आणि उपनगरातील रहिवाशांसाठी MMRDA कडून महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. नागरिकांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असणार आहे. एका कॉलवर आता मुंबईकरांना मदत मिळणार आहे.
नियंत्रण कक्ष नंबर
022- 26591241
022- 26594176
8557402090
टोल फ्री – 1800228801
जलसंपदा विभागाला आदेश
पावसाळयात धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग हा नेहमीच महत्वाचा मुद्दा असतो. पूर नियंत्रण जलसंपदा विभागाचे अधिकारी नियोजनाने व्यवस्थितरित्या पार पाडू शकतात. त्यादृष्टीने संबंधित अभियंत्यांनी या काळात कोणत्याही परिस्थितीत धरणाच्या जागेवरच राहावे आणि मुख्य अभियंता यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय अजिबात मुख्यालय सोडू नये असे निर्देश आजच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
पूर नियंत्रणाच्या दृष्टीने धरणातून किती पाणी कसे सोडण्यात येत आहे ते सर्वसामान्यांना रियल टाईम कळावे म्हणून जलसंपदा विभागाने यंत्रणा विकसित केली असून त्याद्वारे धरण क्षेत्रातील नागरिकांना आगाऊ सूचनाही मिळणार आहेत. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती ही माहिती जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरून 15 जूनपासून लाईव्ह पाहू शकतो.
तंत्रज्ञानाचा अवलंब करून ही यंत्रणा उभारल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले व गेल्या वर्षी चिपळूण पुरानंतर आपण आढावा घेऊन यासंदर्भात दिलेल्या सूचनेप्रमाणे ही यंत्रणा सुरू होत आहे याचा निश्चित उपयोग होईल असं सांगितलं.