Badlapur Crime News: बदलापुरात एका नराधमाने त्याच्या मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच ही बाब पतीला सांगितल्यास तुला जीवे मारुन टाकू अशी धमकी या व्यक्तीने महिलेला दिली होती. मात्र हे वारंवार घडू लागल्यानंतर पत्नीने पतीला याबाबतची माहिती दिली. यानंतर पतीने त्याच्या मित्रालाच संपवल्याचा खळबळजनक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपीने मित्राच्या डोक्यात डोक्यात हातोडी घालून त्याची हत्या केली. तसेच बाथरूममध्ये पडून सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा बनाव या दोघांनी रचल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणाची पोलखोल होण्यासाठी मृत व्यक्तीच्या शवविच्छेदनाचा म्हणजेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट कारणीभूत ठरला आहे. शवविच्छेदन अहवालामधून डोक्यावर जोरदार प्रहार करण्यात आल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यावर या आरोपीची पोलखोल झाली पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
बदलापूरच्या शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश भगत आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती. मात्र सुशांतने नरेशच्या पत्नीवर अतिप्रसंग केला. तसेच पतीला याबद्दल सांगितल्यास जीवे मारुन टाकू अशी धमकी सुशांतने नरेशच्या पत्नीला दिली. नरेशी पत्नी जीवाच्या भीतीने शांत राहिली. मात्र यामुळे सुशांतचा विश्वास वाढत गेला आणि त्याने आणखी काही वेळा तिला धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला. मात्र सततच्या या त्रासाला कंटाळून नरेशच्या पत्नीने हिंमत करून त्याला सुशांतच्या या दुष्कृत्याची माहिती दिली. यानंतर नरेशने आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं दाखवत 10 जानेवारी रोजी सुशांतला घरी बोलावलं. तिथे दुपारी या दोघांनी मद्यपान केलं. त्यानंतर त्या रात्री सुशांत हा नरेशच्याच घरी मुक्कामी राहिला. ही संधी साधून नरेशने सुशांतला संपवलं.
रात्री सुशांत मद्यधुंद अवस्थेत असताना पहाटेच्या सुमारास नरेशने त्याच्या डोक्यात हातोडी मारून त्याची हत्या केली. तसेच सुशांतने जास्त प्रमाणात दारु प्यायल्याने तो बाथरूममध्ये पडल्याचा दावा नरेशने केला. बाथरुममध्ये घसरुन पडल्याने सुशांतच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, असा बनाव रचत नरेशने सुरुवातीला पोलिसांना खोटी माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र ज्यावेळेस सुशांतच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट समोर आले त्यामधील तपशीलामुळे नरेशची पोलखोल झाली.
सुशांतचा मृत्यू अवजड वस्तूने डोक्यात प्रहार केल्यामुळे झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. यानंतर पोलिसांनी नरेश याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच सुशांत याची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. आपल्या पत्नीसोबत दुष्कृत्य केल्याच्या रागातून नरेशने सुशांतला संपवल्याचं पोलिसांना सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी नरेशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती बदलापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली.