मुंबई : कोरोना संकटात गेलेल्या 2020 ला अखेरचा गुड बाय करण्याची वेळ आलीय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सारे सज्ज झालेयत. उद्यापासून बदलणाऱ्या कॅलेंडरसोबत तुमच्या दैनंदिन आयुष्यात देखील महत्वाचे बदल होणार आहेत. नव्या वर्षापासून काही नियमांत बदल होणार आहे. याचा परिणाम तुम्हाला दैनंदिन आयुष्यात जाणवायला लागेल.
8 तासांपेक्षा अधिक वेळ काम करणाऱ्यांना ओव्हरटाईम द्याला लागणार आहे. डेली वर्क ऑवर्स 8 तास ठेवण्यावर विचार केला जात आहे. याला मंजुरी मिळाल्यास ओव्हरटाईम सुरु होईल आणि 8 तासांची ड्युटी करण्यात येईल.
नव्या वर्षात गाड्या खरेदी करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 2020 मध्ये झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी कार उत्पादक कंपन्यांनी हा निर्णय घेतलाय.
दैनंदिन वापराची वस्तू असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढणार आहेत. १ जानेवारीपासून या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत आपण फोन लावण्यासाठी 91 हे बटण दाबत होतो. पण उद्यापासून कॉल करण्याआधी 0 बटण दाबाव लागणार आहे. वाढत्या नंबरची संख्या पाहता या निर्णयामुळे टेलिकॉम कंपन्यांना क्रमांक देखील वाढवता येतील.
नव्या वर्षापासून सर्व गाड्यांना फास्टॅग अनिवार्य असणार आहे. काही अपवाद वगळता विना फास्टॅग गाडी टोलनाक्यावरुन सोडण्यात येणार नाहीय. असे झाल्यास दंड आकारण्यात येणार आहे.
चेकचा व्यवहार करण्यांसाठी महत्वाची बातमी आहे. १ जानेवारीपासून चेकने पैसे देण्याच्या नियमात बदल होईल. चेकचा व्यवहार ५० हजार रुपयांहून अधिक असेल तर पॉझिटिव्ह पेमेंट सीस्टिम लागू होणार आहे. दोन्ही पार्टीकडून याची खात्री केली जाईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे बदल करण्यात आलेयत.
गूगल पे, फोन पे सारखे यूपीआय वापरणाऱ्यांची संख्या पाहता ही यंत्रणा देखील अधिक सुरक्षित केली जाणार आहे. थर्ड पार्टी ॲपच्या यूपीआय पेमेंट सर्व्हिसवर ३० टक्क्यांपर्यंत मर्यादा लावण्यात येणार आहे. एनपीसीआयने हा निर्णय घेतलाय.
रिझर्व्ह बँकेने काँटॅक्टलेस कार्डमधून होणाऱ्या व्यवहाराच्या मर्यादेत ५ हजारांपर्यंत वाढ केली. आरबीआयने डिजिटल पेमेंट पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे महत्वाचे पाऊल उचललंय. सध्या ही मर्यादा २ हजार एवढीच असून ती ५ हजारांपर्यंत वाढवण्यात आलीय.