मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीने आता उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली.
नीरव मोदीने कर्जासंदर्भात आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेला एक पत्र लिहिलंय. या पत्रात त्याने ५ हजार कोटींचं कर्ज घेतल्याचं म्हटलंय.
तसेच आता मी हे कर्ज फेडू शकत नाही असेही म्हटलंय. बँकेनं हे सगळं प्रकरण चव्हाट्यावर आणलं त्यामुळे माझा हिरे आणि दागिने व्यवसाय बुडाला.. माझ्या मालमत्तांवर जप्ती आली त्यामुळे आता मी कर्ज फेडू शकत नाही असेही नीरव मोदीने म्हटलंय.
या सगळ्या प्रकरणामुळे माझी आणि माझ्या कंपनीच्या ब्रँडची बदनामी झाली आहे. माझ्या पत्नीचा आणि मामाचा या प्रकरणाशी काडीचाही संबंध नाही. मात्र हे सगळे प्रकरण समोर आल्याने त्यांचीही बदनामी झाली आहे.
पंजाब नॅशनल बँकेने कर्जाबाबत गुप्तता पाळली नाही. त्यामुळे ते फेडण्याचे मार्ग माझ्यासाठी बंद झाले आहेत. माझ्या पत्नीवर आणि मामावर चुकीचे आरोप लावण्यात आले आहेत असेही नीरव मोदीने बँकेला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.