मुंबई : रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबईतल्या घरी चोरीची घटना घडली. १६ सप्टेंबरला त्यांच्या घरी चोरी झाली. घरातल्य़ा नोकराला दिल्लीतून ताब्यात घेतले आहे. आरोपी नोकर विष्णू कुमारने घरातून किंमती वस्तू, महागडे कपडे चोरले होते. आरोपीजवळ अनेक मोबाईल्स देखील सापडले. पीयूष गोयल यांच्या कुटुंबीयांनी डाटा चोरीचा संशय व्यक्त केला. त्यामुळे जप्त केलेले मोबाईल्स फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत.
दक्षिण मुंबईत व्हिला ओआरबी या इमारतीतील गोयल यांच्या घरातून अनेक वस्तू चोरीला गेल्या होत्या. चोरी झाल्याची बाब पीयूष गोयल यांच्या पत्नीच्या लक्षात आल्यानंतर गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तपास करीत दिल्लीतून विष्णूकुमार याला अटक केली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये नोकराकडे या वस्तूसोबत एक हार्डडिस्कही सापडली. या हार्डडिस्कमधील काही डेटा विष्णूकुमार याने ईमेलवरून काही लोकांना पाठविल्याचे उघड झाले आहे. हा नेमका डेटा काय आहे आणि तो कुणाला पाठविण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.