मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले कायमच त्यांच्या वेग-वेगळ्या कपड्यांमुळे देखील ओळखले जातात. गडद रंगाचे त्यावर वेगळ्या प्रकारच्या रंगछटा असलेले कपडे ते कायम परिधान करून मंत्रालयात उपस्थित राहतात. पण आता राज्य सरकारने ठरवून दिलेल्या नव्या ड्रेस कोडमुळे मंत्रालयात अता कसं जाता येणार असा प्रश्न रामदास आठवले यांनी ट्विटरच्या मध्यमातून उपस्थित केला आहे. सरकारने लागू केलेल्या निर्णयानुसार मंत्रालयात आता जिन्स आणि टी शर्ट घालता येणार नाही. शिवाय गडद रंगाचे चित्रविचित्र कपडे घालण्यास राज्य सरकारकडून मनाई घालण्यात आली आहे.
राज्यसरकार ने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल? pic.twitter.com/yS7jM7G8Xw
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) December 13, 2020
'राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल?' असा प्रश्न केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला.
शिवाय, महिला कर्मचाऱ्यांना देखील नवा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजे शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत असं देखील नव्या नियमांत सांगितले आहे.