मुंबई : सकाळी सुरळीत असलेल्या मुंबईत आता मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या वेगवेगळ्या भागात आंदोलनामुळे वाहतूक कोंडी बघायला मिळते आहे. रस्त्यांवर वाहनांच्या रांगा आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक उपनगरांमध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी रस्ते रोखून धरत आहेत. यामुळे पश्चिम दृतगती महामार्गावर आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
लोकल वाहतुकीवर परिणाम झालेला नाही. त्याशिवाय अत्यावश्यक सेवाही सुरू आहेत. सकाळच्या सत्रात शाळाही सुरू होत्या.
चेंबूरमधल्या घाटला व्हिलेजपासून मराठा समाजाच्या मोर्चाला सुरूवात झाली आहे. दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करत हा मोर्चा आता चेंबूरच्या शिवाजी चौकाकडे निघाला आहे.