Sanjay Raut On Aurangzeb Born In Gujrat: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीसंदर्भात नगरमधील जाहीर सभेत केलेल्या विधानावरुन त्यांच्याविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल पत्रकारांशी चर्चा करताना संजय राऊत यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं सांगत आपण कोणीचीही तुलाना औरंगजेबाशी केलेली नाही असं स्पष्ट केलं आहे.
मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी, "छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे या सर्व महान व्यक्तींचा जन्म महाराष्ट्रात झाला. आम्ही हे गर्वाने सांगतो. महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या महान नेत्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला. त्याप्रमाणे संपूर्ण देशाला आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्राविरुद्ध ज्याने संघर्ष केला त्या औरंगजेबचा जन्म झाला. यात मी चुकीचं काय म्हणालो? ज्या मातीत औरंगजेबचा जन्म झाला त्या मातीचे गुणधर्म तेथील राजकारण्यांना लागले असतील. अशाप्रकारे मोदीजी आणि शहाजी महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत. महाराष्ट्र तोडण्याचे, लुटण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये मिरची लागण्यासारखं काय आहे. मी कोणाला औरंगजेब म्हणालेलो नाही. ही एक विकृती आहे," अशी टीका संजय राऊत यांनी नोंदवली.
"तुम्ही गाडण्याची भाषा केल्याने तक्रार नोंदवण्यात आली आहे," असं म्हणत पत्रकाराने प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी, "जे महाराष्ट्रावर चाल करुन येतील त्यांना गाडू, ती कोणावरही केलेली व्यक्तिगत टीका नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ही भाषा आम्ही बोलतो. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही याच मातीत गाडलं आहे. मग अफजल खान असेल, शाहिस्तेखान असेल. औरंगजेबसारखे अनेक लोक आहेत ज्यांनी आम्ही महाराष्ट्राच्या मातीत गाडलं. महाराष्ट्र संघर्ष करुन मिळवला आहे. हौतात्म देऊन मिळवला आहे, यात काही चुकीचं आहे का? नाही ना! एवढ्या मिरच्या झोंबण्याचं कारण काय? औरंगजेबाचे फोटो लावा तुमच्या मोदींच्या बाजूला. तुम्ही त्याच वृत्तीचे लोक आहात. क्रूर, सुडबुद्धीने वागणारे, धर्माचं आणि धर्मांधतेचं राजकारण करणारे," असं म्हणत राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.
संजय राऊत यांच्याविरोधात त्यांनी नगरमधील जाहीर सभेत केलेल्या विधानावरुन तक्रार दाखल करण्यात आली आहे. राऊत यांनी नाशिकमध्ये सभा होणार असून त्यापूर्वी नाशिकमध्येच ही तक्रार दाखल करण्यात आल्याने सभेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणूनच या औरंगजेब विधानावरुन आता सभेपूर्वीच राजकारण तापल्याचं चित्र दिसत आहे. भाजपा समर्थकांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये जाऊत यांनी पंतप्रधानांसंदर्भात भाष्य करताना गाडून टाकण्याची भाषा केल्याने त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे.
मोदींनी बाळासाहेबांच्या नकली संतान असं म्हणत टीका केल्याचा संदर्भ देत पत्रकाराने प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी, "जर ते उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची नकली संतान म्हणत असतील तर ते बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मिनाताई ठाकरे एक देवता समान माता-पिता होते. पूर्ण महाराष्ट्रात पूजा करतो. कदाचित मोदीजी हे विसरले आहेत. मोदीजींच्या मेंदूत काहीतरी गडबड झाली आहे. कोणी बाळासाहेब ठाकरे आणि मिनाताई ठाकरेंचा अशाप्रकारे अपमान करत असेल तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही. कोणाला स्वत:ची खरी संतान असेल तर त्याबद्दल बोलावं," असा टोला लगावला.
"माननीय हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्याबाबतीत हे अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. देवता समान व्यक्तीमत्वं होती. या दोन्ही व्यक्तीमत्वांना महाराष्ट्र पुजतो, त्यांना तुम्ही नकली म्हणता? ही तुमची हिंमत? म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात. तुम्ही औरंगजेबचे वंशज आहात," असं राऊत म्हणाले.