प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : मुंबईसह आसपासच्या शहरांची लाईफलाईन असणाऱ्या लोकल रेल्वेमध्ये (local train) हुल्लडबाजांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होताना दिसत असते. अनेकादा प्रवासी रेल्वेच्या दारात लटकून प्रवास करतात. तर कधी रेल्वेच्या टपावरुन जीवघेणा प्रवास करत असतात. अशा प्रवाशांमुळे इतरांचाही जीव धोक्यात घातला जातो.
त्यामुळेच रेल्वेने अशा प्रवाशांसाठी काही कडक नियम केले आहेत. रेल्वे प्रवासामध्ये ज्वलनशील पदार्थ नेण्यास मनाई असतानाही एका प्रवाशाने चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवर धुम्रमान (SMOKING) केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
नालासोपारा स्टेशनवरील रेल्वे प्लॅटफॉर्मवर सिगरेट ओढणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ झी २४ तासच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रेल्वे स्थानकात सिगारेट ओढण्यासाठी बंदी असताना देखील हा तरुण बिनधास्तपणे सिगरेट ओढताना दिसत आहे.
मंगळवारी सकाळी 11.20 वाजण्याच्या सुमारास हा तरुण नालासोपारा रेल्वे स्थानकात सिगरेट ओढत रेल्वे प्लॅटफॉर्मवर आला होता. त्यानंतर ट्रेन मध्ये चढताना तो शेवटची झुरकी घेत सिगरेट फेकताना समोर आलं आहे.
ट्रेन आणि प्लॅटफॉर्मवर धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 167 अन्वये हा दंडनीय गुन्हा आहे.
दरम्यान, जळती सिगरेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर फेकल्यामुळे कोणताही अनुसूचित प्रकार घडण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने तसं काही झालं नाही. या प्रकारावर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून रेल्वे प्रशासनाने त्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.