मुंबई : मुंबईसह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतो आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. कोरोना संकटामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक राज्यातील मजूर मुंबईत अडकले आहेत. आपापल्या गावी पोहचण्यासाठी मजूरांची धडपड सुरु आहे. अशा परिस्थितीत मजूरांना लालपरीचा आधार मिळाला आहे. एसटी बसेस स्थलांतरीत मजुर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या आहेत. 9 मे पासून आतापर्यंत 36 हजार 432 बसेसद्वारे मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरुप पोहचवण्यात आलं आहे.
4 लाख 33 हजार 509 स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एसटीने आतापर्यंत मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली आहे. राज्याच्या विविध भागांतून श्रमिकांना घेऊन, सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचं पालन करत सुरक्षितपणे मजूरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहचवण्यासाठी एसटीचे हजारो चालक अहोरात्र मेहनत घेत आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून इतर राज्यातील स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवलं जात असताना इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना राज्यात आणण्याचंही काम एसटी करत आहे. आगामी काळातही लॉकडाऊन संपेपर्यंत अशाचप्रकारे कष्टकरी कामगार-मजुरांना सीमेपर्यंत पोचवण्याचं आणि तेथे अडकलेल्या आपल्या राज्यातील श्रमिकांना सुखरूप घरी घेऊन येण्याची मोहीम एसटी महामंडळाच्यावतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मजूरांनी धोकादायकरित्या पायपीट न करता, एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा, असं आवाहन परिवहन मंत्र्यांनी केलं आहे.