स्टँड-अप कॉमेडियन आणि बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पण काही वेळाने त्याची सुटका करण्यात आली होती. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सामाजिक शाखेने दक्षिण मुंबईतील एका हुक्का बारवर धाड टाकली होती. यावेळी 14 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये मुनव्वर फारुकीचाही समावेश होता. दरम्यान पोलिसांनी सुटका केल्यानंतर मुनव्वर फारुकीने सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली आहे.
मुंबई पोलिसांच्या सामाजिक शाखेने मंगळवारी रात्री 10.30 वाजता बोरा बाजार परिसरातील हुक्का पार्लरवर धाड टाकली. बुधवारी पहाटे 5 वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. "धाड टाकल्यानंतर पोलिसांना स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी इतरांसह हुक्का ओढताना आढळला. आमच्याकडे याचा व्हिडीओ पुरावाही आहे. आम्ही मुनव्वर फारुकी आणि इतरांना ताब्यात घेतलं आहे. पण त्यांच्यावर लावण्यात आलेले कलम जामीनपात्र असल्याने नंतर त्यांना जाऊन देण्यात आलं," अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
पोलिसांना काहीजण हर्बल हुक्का पिण्याच्य नावाखाली पार्लरमध्ये तंबाखूयुक्त हुक्का पीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती असं अधिकाऱ्याने सांगितलं. मुनव्वर आणि इतरांवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 283 (सार्वजनिक मार्गात किंवा मार्गात धोका किंवा अडथळा), 336 (इतरांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारे कृत्य) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं. मुनव्वर आणि इतरांना माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी नोटिसा बजावल्या होत्या आणि त्यांना जाण्याची परवानगी दिली, असे ते म्हणाले.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुनव्वर फारुकीची सुटका केली. यासंबंधी बोलताना पोलिसांनी सांगितलं की, "हा जामीनपात्र गुन्हा असला तरी पोलिसांनी नोटीस बजावली आणि त्यानंतर फारुकीला जाऊ दिलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हर्बलच्या नावाखाली तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्या पथकाने मुंबईतील एका हुक्का बारवर छापा टाकला होता".
पोलिसांनी सुटका केल्यानंतर मुनव्वर फारुकीने इंस्टाग्रामला स्टोरीजमध्ये सेल्फी शेअर केली आहे. यामध्ये तो हसताना दिसत आहे. एका रुममध्ये तो उभा असून निळा टी-शर्ट आणि टोपी घातली आहे. 4 वाजून 55 मिनिटांनी फोटो काढल्याचा स्टॅम्प त्याने फोटोवर टाकला आहे. तसंच 'थकलो आहे आणि प्रवास करतोय' अशी कॅप्शन दिली आहे. त्यात त्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं लोकेशनही दिलं आहे.