मुंबई : राज्यातील नाट्यमय राजकीय घडामोडी पुढील 11 जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाख केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि सुनिल प्रभू यांच्यासह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर उत्तर देणारे प्रतिज्ञापत्र 5 दिवसांच्या आत फाईल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पुढील सुनावणी होईपर्यंत बहुमत चाचणी घेऊ नये असेही न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे.
विधानसभा उपाध्यक्षांच्या अपात्रत्रेच्या नोटीसीला सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलै पर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे अपात्रतेची कारवाई केलेल्या बंडखोर 16 आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बंडखोर 39 आमदारांच्या जीवाची किंवा त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. या संदर्भात राज्य सरकारनं खबरदारी घ्यावी आणि या आमदारांच्या घराला आणि कुटुंबाला सुरक्षा पुरवावी असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.