मुंबई : राज्यात कोणाचं सरकार बनणार? हा प्रश्न आता गहन बनलाय. एकीकडे राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेत चर्चा सुरू असताना दुसरीकडे राजभवनावर मात्र राष्ट्रपती राजवटीच्या हालचालींनी चांगलाच वेग घेतलाय. राजभवनावर वर्दळ वाढलेली दिसतेय. परंतु, राजभवनाच्या प्रतिनिधींनी मात्र राष्ट्रपती राजवटीसंबंधी काहीही बोलण्यास नकार दिलाय. 'सत्तास्थापनेसंबंधी बोलताना आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला समर्थन देण्यासाठी तयार आहोत. पण फक्त त्या समर्थनाचं स्वरुप काय राहील, हे आम्हाला आता ठरवायचं आहे', अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीय.
आम्ही किमान समान कार्यक्रम बनवून एकत्र वाटचाल करून. यामध्ये, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपापल्या विचारधारांशिवाय जनतेसाठी 'सबका साथ, सबका विकास'साठी काम करू, असंही सुशील कुमार शिंदे यांनी यावेळी म्हटलंय.
तर, 'राष्ट्रवादीला आज सायंकाळपर्यंतची वेळ देण्यात आलीय. सकारात्मक गोष्टी घडतील, अशी आशा करूया... काँग्रेसमध्ये अंतर्गत कोणतंही दुमत नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आज मुंबईत राष्ट्रवादीशी चर्चा करून निर्णय घेतील', अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिलीय.
दरम्यान, काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची आज दिल्लीत भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुंबईला दाखल होत आहेत. काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे आणि के सी गोपाल शरद पवार यांच्याशी पुढची चर्चा करणार आहेत.